जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘मायक्रो प्लॅनिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:08 PM2019-12-04T12:08:20+5:302019-12-04T12:08:26+5:30

निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार सक्षम व दमदार असावा, या उद्देशातून जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Shiv Sena's 'micro planning' for Zilla Parishad elections | जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘मायक्रो प्लॅनिंग’

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘मायक्रो प्लॅनिंग’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढण्याच्या अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी मंगळवारी पक्षातील उपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महाविकास आघाडीच्या मुद्यावरही प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती असून, निवडणूक लढणाऱ्या संभाव्य उमेदवारांसाठी ‘मायक्रो प्लॅनिंग’ करण्यावर भर देण्याची सूचना यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केली.
राज्यात शिवसेनेने भाजपाला बाजूला सारत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. राज्यातील अनपेक्षित व धक्कादायक सत्तांतरामुळे स्वायत्त संस्थांच्या स्तरावर एकमेकांसोबत सोयीनुसार भूमिका घेणाºया शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आदी प्रमुख राजकीय पक्षांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे गठन होऊन आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यावरही राज्य स्तरावर विचारविमर्श सुरू आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सावध पवित्रा घेतला जात असला तरी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार सक्षम व दमदार असावा, या उद्देशातून जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
त्या पृष्ठभूमीवर मंगळवारी आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा कार्यकारिणीतील उपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुखांसोबत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. शिवसेनेच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी सुमारे ४२२ पेक्षा अधिक उमेदवारांनी पक्षाचे अधिकृत अर्ज स्वीकारले. संबंधित उमेदवारांची पक्षासोबत व सर्वसामान्यांसोबत असलेली बांधीलकी, सामाजिक तसेच राजकीय कार्यात असलेला सक्रिय सहभाग आदी सर्व बाबी तपासल्यानंतरच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या मुद्यावर बैठकीत खलबते पार पडल्याची माहिती आहे.
आता तालुकानिहाय बैठकांचे आयोजन
 जिल्हा परिषदेच्या ५३ सर्कलमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या आहे. संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या बुधवारपासून तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
 उद्या मूर्तिजापूर येथे सायंकाळी ५ वाजता पदाधिकारी, सर्कल प्रमुखांसोबत बैठक होईल. गुरुवारी बाळापूर व त्यानंतर पातूर, अकोट व बार्शीटाकळीमध्ये बैठका होतील.

सेनेचे ‘मिशन जिल्हा परिषद’
गत तीन वर्षांमध्ये शिवसेनेने जिल्हाभरात पक्ष संघटनेला प्राधान्य दिल्याचे सकारात्मक परिणाम आता पाहावयास मिळत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघावर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकल्यामुळे शिवसेनेत नवचैतन्याचे वातावरण आहे. शिवसैनिकांनी एकदिलाने काम करण्याचे आश्वस्त केल्यामुळेच जिल्हाप्रमुखांनी ‘मिशन जिल्हा परिषदे’चा नारा दिला आहे. या मुद्यावरही बैठकीत चर्चा पार पडली.


जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काटेकोर नियोजनाची गरज आहे. त्यानुषंगाने पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद निवडणुकीत नक्कीच यश मिळेल, असा विश्वास आहे.
-नितीन देशमुख,
आमदार

Web Title: Shiv Sena's 'micro planning' for Zilla Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.