हजारोंच्या साक्षीने झाला शिव-पार्वतीचा विवाह
By admin | Published: April 4, 2017 01:30 AM2017-04-04T01:30:37+5:302017-04-04T01:30:37+5:30
लहान उमरी येथील प्राचीन शिवमंदिरात सोमवारी रात्री आठ वाजता अनेक वर्षांच्या परंपरागत पद्धतीने शिव-पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला.
अकोला: स्थानिक लहान उमरी येथील प्राचीन शिवमंदिरात सोमवारी रात्री आठ वाजता अनेक वर्षांच्या परंपरागत पद्धतीने शिव-पार्वतीचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला हजारो अकोलेकरांनी विशेष हजेरी लावली. या विवाह सोहळ््याच्या निमित्ताने लहान उमरी परिसरातील शिवमंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
लग्न सोहळ््याप्रमाणे शिव आणि पार्वतीच्या पिंडीला सजविण्यात आले. वाजंत्री, वऱ्हाडी आणि मंगलाष्टकानंतर अक्षता टाकून हा विवाह पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेवाच्या या आगळा-वेगळा लग्न सोहळ््याला पाहण्यासाठी दूरदूरून लोक आले होते. त्यानिमित्ताने मंदिराभोवती लघुव्यवसायिकांनी खेळणी आणि जत्रेसारखी दुकाने थाटले होते. उमरी उमरखेडवासीयांचे महादेव संस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून दरवर्षीच्या चैत्र शुद्ध अष्टमीच्या या मुहूर्तावर लग्न सोहळ्यानिमित्त येथे यात्रेचे स्वरूप येते. ही प्रथा गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे सोमवारी सकाळी महादेवाचे पूजन, ग्रंथपठण, महिलांचे भजन, सामुदायिक प्रार्थना, लग्नाची मिरवणूक काढून आणि रात्री विवाह सोहळा पार पडला. मंगळवारी या परिसरात दहीहंडी आणि महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. लग्न सोहळा आणि यात्रेच्या यशस्वीतेसाठी महादेव संस्थानचे अध्यक्ष उमेश मसने, प्रशांत धनोकार, डॉ. मधुकर शेगोकार, जयंत मसने, डॉ. संतोष हुसे, अरुण काळे, संतोष वाढोकार, गंगाधर नावकार, विजय सारभुकन, ओंकार डोके व आकाश सायखेडे आदींनी अथक परिश्रम घेतलेत.