शिवसेनेने फाडला भाजपाचा फलक!
By admin | Published: June 9, 2017 04:06 AM2017-06-09T04:06:53+5:302017-06-09T04:06:53+5:30
कर्जमाफीच्या मुद्यावरून सेनेचा आरोप : कर्जमाफीचे बँकांना निर्देश नसताना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर लावण्यात आले; मात्र क र्जमाफीच्या मुद्यावर जिल्हा प्रशासनासह बँकांना कोणतेही दिशानिर्देश प्राप्त नसून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत शिवसेनेने शहरात राडा केला. गुरुवारी दुपारी शिवसेनेने त्यांच्या खास ‘स्टाइल’मध्ये भाजपाने शहरात लावलेले सर्व बॅनर, पोस्टर फाडून टाकले. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.
तूर-सोयाबीनसह शेतमालाला हमीभावसुद्धा मिळाला नसल्यामुळे राज्य शासनाप्रती शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. तूर खरेदीच्या मुद्यावरून शासनाने झुलवत ठेवल्याचा मुद्दा शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला. राज्य सरकारमध्ये सहभागी शिवसेनेने शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्तीचा नारा देत भाजपाला जेरीस आणण्याचा प्रयत्न चालविल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापात भर पडल्याचे दिसून येते. शेतमालाला हमीभाव देण्यात शासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी राज्यभरात आंदोलने सुरू केली. आंदोलनांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३१ आॅक्टोबरपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी संपूर्ण शहरात पोस्टर, बॅनर उभारले.
जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू झाली असतानाच शेतकऱ्यांना क र्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ कधी, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. भाजपाचा हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी मदनलाल धिंग्रा चौकात भाजपाने लावलेले पोस्टर फाडले. यावेळी पोलिसांनी जिल्हाप्रमुखांसह श्रीरंग पिंजरकर, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बंडूभाऊ ढोरे, दिलीप बोचे, रवींद्र पोहरे, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, तालुकाप्रमुख विकास पागृत, विजय मोहोड, श्याम गावंडे, संजय शेळके, रवी मुर्तडकर, नगरसेवक मंगेश काळे, अश्विन नवले, गजानन चव्हाण, योगेश गिते, अभिषेक खरसाडे, नंदू ढोरे, राहुल कराळे, डॉ. प्रशांत अढाऊ, सागर भारुका, के दार खरे, मुन्ना मिश्रा, योगेश बुंदेले, योगेश अग्रवाल, सुनीता मेटांगे, शुभांगी किनगे, ज्योत्स्ना चोरे, वनिता पागृत, अविनाश मोरे, योगेश बकाल, विशाल कपले, सुनील दुर्गिया, मुन्ना भाकरे, स्वप्निल अहिर, लक्ष्मण पंजाबी, रोशन राज, शुभम वानखडे, सागर ढोले, गणेश टाले यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.