शिवसेना स्वबळाच्या तयारीत!

By admin | Published: July 13, 2017 01:28 AM2017-07-13T01:28:16+5:302017-07-13T01:28:16+5:30

कर्जमुक्ती आंदोलनात सातत्य : नव्या दमाचे नेतृत्व शोधण्याची मोहीम

Shivsena swabalaya ready! | शिवसेना स्वबळाच्या तयारीत!

शिवसेना स्वबळाच्या तयारीत!

Next

राजेश शेगोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिवसेना केंद्र व राज्यात भाजपासोबत सत्तेमध्ये असली, तरी पहिल्या दिवसापासून सेनेच्या नेत्यांनी अघोषित विरोधकांचीच भूमिका पार पाडण्याचे कर्तव्य चोखपणे सुरू केले होते. ते महापलिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकानंतर अधिक प्रखरपणे समोर आले. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या सेनेच्या नेत्यांनी कर्जमुक्तीच्या मुद्यावर थेट रस्त्यावर येऊन सरकारविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे मध्यावधीचे वारे जोरात वाहू लागले असून, शिवसेना स्वबळावर सत्तेची गणिते आखत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोल्यातही त्या दृष्टीने सेनेने चाचपणी सुरू केली असून, खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अकोल्यातील वाढत चालेला राबता ‘स्वबळा’चे सुतोवाच करणारा ठरला आहे.
अकोल्याच्या राजकारणात दोन दशकांपूर्वी शिवसेनेचा बोलबाला होता. मुळातच सेना अन् भारिप-बमसं यांचा प्रवास सारखा सुरू झाला होता. मात्र, भारिपने त्यांचे अस्तित्व कायम ठेवले, या उलट सेनेचा मित्र पक्ष मोठा झाला अन् सेनेचा ‘बोन्साय’ झाला; त्यामुळेच गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सेनेला एकाही मतदारसंघात यश मिळविता आले नाही, तसेच महापालिका व नगरपालिका निवडणुकांमध्येही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. या पृष्ठभूमीवर सेना आता पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागली आहे. कर्जमुक्तीचा नारा देत सेनेने बाळापूर मतदारसंघातून सुरू केलेले आंदोलन जिल्हाभर नेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्याची संधी सर्वात प्रथम साधली. या आंदोलनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी अकोल्याचीच निवड केली. अकोल्यातूनच ऊर्जा घेत नाशिक येथे शेतकऱ्यांच्या मेळाव्यात कर्जमाफीसाठी आंदोलनाची हाक देत शेतकरी संपाला पाठिंबा दिला व त्यानंतर अवघ्या महिनाभरात शेगावात मेळावा घेऊन शिवसंपर्क अभियानात सुरू केलेला संपर्क कायम ठेवला. सेनेचे संपर्कप्रमुख खा. अरविंद सावंत यांनी हेडमास्टरची भूमिका घेत, सेनेमध्ये शिस्त आणली व संघटनेवर पकड बसवली.
ही सारी तयारी स्वबळावर लढण्यासाठीच असल्याचे स्पष्ट होते. सेनेची पहिली टक्कर ही भाजपासोबतच होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिममध्ये भाजपला ६६९३४, तर सेनेला १०५७२ मतं मिळाली होती. अकोला पूर्व मतदारसंघात भाजपला ५३६७८, तर शिवसेनेला ३५५०४ मते मिळाली. अकोट, मुर्तिजापुरात सेना तिसऱ्या क्रमांकावर राहिली. महापलिका निवडणुकांमध्ये सेनेला मिळालेल्या जागा या केवळ आठ आहेत. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातही सेनेला कंबर कसावी लागणार आहे. त्यामुळेचे सेनेने कर्जमुक्ती आंदोलनात सातत्य ठेवत जनसंपर्क कायम ठेवला आहे. कर्जमाफी आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी भाजपाने लावलेल्या फलकांविरोधात आक्रमक भूमिका घेण्यापासून, तर सरसकट कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्याचा आग्रह धरत ढोल वाजविण्यापर्यंत अशा आंदोलनाची तीव्रता वाढविली आहे. ही सर्व तयारी भाजपासोबत टक्कर देण्यासाठीच असल्याचे संकेत सेनेच्या नेत्यांना आहेत. त्यामुळे आगामी काळात सेना-भाजपाचा संघर्ष आणखी तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही. काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या विरोधी पक्षांना सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी मुद्दाच न ठेवता सेनेने घेतलेली आंदोलनाची भूमिका ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणातही वजाबाकी करणारी ठरली आहे.

जिल्हाप्रमुखांना वेध बाळापूरचे!
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे वेध लागल्याची चर्चा सेनेच्या वर्तुळात आहे.
त्यामुळेच कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू करताना जाणीवपूर्वक बाळापूरची निवड करण्यात आली होती. आ. गोपीकिशन बाजोरिया, विजय मालोकार, राजेश मिश्रा, माजी आ. संजय गावंडे अशी इच्छुकांची मोठी फळी सेनेतही आहे. मूर्तिजापूरसाठी सेना नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.

संघटनेत बदल झाला, पण...
खासदार अरविंद सावंत यांनी सेनेच्या संघटन बांधणीला प्राधान्य देत संघटना चांगली बांधली. आपसातील मतभेद आता बऱ्यापैकी मिटल्याचे दाखविले जात आहेत. मात्र, महापालिका स्वीकृत सदस्य निवडणुकीमध्ये ते बाहेर येऊ शकतात, अशी स्थिती आहे. संघटनेत सह संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, आमदार गोपिकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, शहरप्रमुख अतुल पवनीकर, राजेश मिश्रा यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मात्र, मनपा निवडणुकीत या बदलाचा सत्त्तेमधील आकडे वाढल्याचा परिणाम दिसला नाही.

Web Title: Shivsena swabalaya ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.