शिवसेना विदर्भात फुंकणार रणशिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:38 PM2019-01-16T12:38:02+5:302019-01-16T12:38:08+5:30
अकोला: विदर्भातील लोकसभेच्या १० मतदारसंघांमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसेना रणशिंग फुंकणार असून, सभेच्या नियोजनासाठी बुधवारी नागपूर येथे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
अकोला: विदर्भातील लोकसभेच्या १० मतदारसंघांमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून शिवसेना रणशिंग फुंकणार असून, सभेच्या नियोजनासाठी बुधवारी नागपूर येथे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा आदेश शिवसेना भवन येथून जारी करण्यात आला आहे.
कधीकाळी विदर्भात दरारा असणाºया शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत भाजपाने पीछाडीवर टाकल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकदा स्पष्ट केल्यानंतर त्यांचा मोर्चा विदर्भाकडे वळल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील शेतकºयांच्या अडचणी, समस्या सोडविण्याच्या उद्देशातून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्व आणि पश्चिम विदर्भात गाव तेथे शाखा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मागील काही वर्षांत पूर्व-पश्चिम विदर्भात भाजपाने मजबूत पक्ष बांधणी केल्याचे चित्र आहे. उशिरा का होईना, ही बाब शिवसेनेच्या निदर्शनास आली असून, वर्षभराच्या कालावधीत पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चार वेळा दाखल होऊन पक्ष संघटनेचा आढावा घेतला. शेतकºयांचा भाजपविरोधी सूर आणि पक्षासाठी वातावरण सकारात्मक असल्याचे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील लोकसभेच्या दहा मतदारसंघांवर पकड निर्माण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभांचे आयोजन केले जाणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यानुषंगाने १६ जानेवारी नागपूर येथील काटोल नाका परिसरातील जंक्शन-फंक्शन हॉलमध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला प्रमुख पदाधिकाºयांना उपस्थित राहण्याचे फर्मान जारी करण्यात आले आहे.
या मतदारसंघांचा आहे समावेश
नागपूर येथील बैठकीत नागपूर लोकसभा, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, यवतमाळ-वाशिम, अमरावती, अकोला व बुलडाणा लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकाºयांचा समावेश राहणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होईल.
-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना.