शिवसेनेच्या महिला आघाडीत फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 02:34 PM2019-02-16T14:34:10+5:302019-02-16T14:34:15+5:30
अकोला: जिल्ह्यात महिला संघटनेची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख मधुरा देसाई यांनी जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल केले आहेत.
अकोला: जिल्ह्यात महिला संघटनेची पाळेमुळे घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख मधुरा देसाई यांनी जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल केले आहेत. अकोला पश्चिमच्या शहर संघटिका (शहर प्रमुख) राजेश्वरी शर्मा यांना पदमुक्त करीत शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांच्यावर शहर प्रमुख (संघटिका) पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
शिवसेनेच्या महिला संघटनेमध्ये १२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर फेरबदल करण्यात आल्याचे दिसून येते. बोटावर मोजता येणाऱ्या चार-पाच महिला पदाधिकाºयांच्या अवतीभोवती संघटनेची सूत्रे फिरत होती. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात महिला संघटनेकडे शोधूनही महिला कार्यकर्त्या नसल्याची परिस्थिती होती. परिणामी, शहर व तालुका स्तरावरील कार्यकारिणीत विविध पदांवर अनेक महिला कागदोपत्री कार्यरत असल्याचे चित्र होते. ही बाब पश्चिम विदर्भाच्या संपर्क प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणाºया संपर्क प्रमुख मधुरा देसाई यांच्या ध्यानात येताच त्यांनी सर्वप्रथम महिला संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा संघटिका पदावर माया म्हैसने, देवश्री ठाकरे यांची नियुक्ती केल्यानंतर शहर कार्यकारिणीतही पक्षासाठी काम करण्यास इच्छुक असणाºया महिलांचा समावेश करण्यात आला. अकोला पूर्वच्या शहर संघटिका (शहर प्रमुख) पदावर वर्षा पिसोळे यांची तर अकोला पश्चिमसाठी राजेश्वरी शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर संपर्क प्रमुख मधुरा देसाई यांनी पुन्हा फेरबदल क रीत अकोला पश्चिमच्या शहर संघटिका राजेश्वरी शर्मा यांना पदमुक्त केले आहे. या पदाची धुरा सेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, तसेच मूर्तिजापूर उपजिल्हा संघटिकापदी ज्योती माहोकार, मूर्तिजापूर शहर संघटिका- पूजा घाटोळ, बार्शीटाकळी तालुका संघटिका- नंदा बिल्लेवार, अकोला उपजिल्हा संघटिका उषा गिरनाळे आणि अकोट तालुका संघटिका पदावर शिल्पा ढोले यांची नियुक्ती केली आहे.
१९ नोव्हेंबरनंतर हालचाली वाढल्या!
शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात १९ नोव्हेंबर रोजी शहरात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांप्रती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या सोहळ्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्यानंतर महिला संघटनेत फेरबदल करण्याच्या हालचालींनी वेग घेतला होता.
संघटनेत काम करण्यासाठी जिल्ह्यात अनेक महिला इच्छुक आहेत. महिला संघटनेची बांधणी मजबूत करण्याच्या उद्देशातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार फेरबदल करण्यात आले आहेत.
-मधुरा देसाई, संपर्क प्रमुख महिला आघाडी, शिवसेना.