शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:19 AM2017-07-19T01:19:15+5:302017-07-19T01:19:15+5:30

उपतालुका, सर्कल प्रमुखांच्या रविवारी नियुक्त्या

Shivsena's district executive sealed | शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब

शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत मागील पंधरा वर्षांपासून ठाण मांडून बसणाऱ्या व नवीन शिवसैनिकांची अडवणूक करणाऱ्या उपतालुका प्रमुख, सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुखांपासून ते इतर पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करून नव्या दमाच्या शिवसैनिकांच्या जिल्हा कार्यकारिणीवर पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खा. अरविंद सावंत यांनी शिक्कामोर्तब केले आहे. २३ जुलै रोजी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
आगामी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणूक लक्षात घेता शिवसेनेने पुन्हा एकदा पक्ष बांधणीकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. मागील पंधरा वर्षांमध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सेनेच्या शाखा उघडून गाव तेथे कार्यकर्ता असल्याचा दावा पक्षाकडून केला जात होता. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा अकोट, बोरगावमंजू विधानसभा मतदारसंघ सेनेच्या हातातून कधीचाच निसटून गेल्यामुळे पक्षाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. पक्ष संघटनेत फेरबदल करून नव्या दमाच्या शिवसैनिकांना काम करण्यासाठी संधी न दिल्यामुळे की काय, शिवसैनिकांनी पक्षापासून दोन हात लांब राहण्याची भूमिका घेतली. कार्यकर्ता दुरावत गेल्याची परिस्थिती असताना कागदावर मात्र जिल्हा कार्यकारिणी जिवंत होती. ही बाब लक्षात आल्यामुळेच शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीसह महिला संघटन आणि युवा सेनेत सक्रिय राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची इत्थंभूत माहिती सादर करण्याचे निर्देश मध्यंतरी संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिले होते.
त्यानुषंगाने जिल्हा प्रमुखांनी जिल्हा कार्यकारिणीतील उपतालुका प्रमुख, सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुखांपासून ते शाखा प्रमुखांच्या योगदानाचा अहवाल संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांच्याकडे सादर केला. संपर्क प्रमुख खा. सावंत यांनी जिल्हा कार्यकारिणीला हिरवी झेंडी दिली असून, २३ जुलै रोजी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील.

महिला संघटन, युवा सेनेत होणार फेरबदल
जिल्ह्यात शिवसेनेच्या महिला संघटनेची दमदार कामगिरी ध्यानात घेता महिला संघटनेची सूत्रे नव्या चेहऱ्याच्या हातात सोपविल्या जाणार आहेत. सेनेच्या माजी नगरसेविका असलेल्या महिला कार्यकर्त्याची या पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. पक्षाचे कायदेविषयक सल्लागार म्हणून ओळख असणाऱ्यांकडून ही फिल्डिंग लावण्यात आली आहे. सोबतच युवा सेनेसाठी पदाधिकाऱ्यांची मुले, भाऊ, नातेवाइकांपेक्षा सक्रिय शिवसैनिकाला संधी देण्यावर संपर्क प्रमुखांनी एकमत केल्याची माहिती आहे.

काडीबाज पदाधिकाऱ्यांवर मंथन!
पक्षवाढीला हातभार लावण्यापेक्षा पक्षात नवीन आलेल्या व सक्रिय राहणाऱ्या शिवसैनिकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम काही पदाधिकाऱ्यांमार्फत केले जात असल्याच्या मुद्यावर संपर्क प्रमुख अरविंद सावंत आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. अशा पदाधिकाऱ्यांना पक्षातील धोरणात्मक निर्णयांपासून दूर ठेवण्यावर आणि वेळप्रसंगी त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यावर मंथन झाले आहे.

Web Title: Shivsena's district executive sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.