शिवसेनेचे ‘ढोल वाजवा’आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 01:30 AM2017-07-07T01:30:19+5:302017-07-07T01:30:19+5:30
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रमुखांना आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांवरून संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या आकडेवारीबाबत सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आग्रही असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा बँकांसमोर ‘ढोल वाजवा’आंदोलन छेडण्याचा आदेश गुरुवारी जिल्हाप्रमुखांना दिला.
राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचे निकष, दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी व राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे उपलब्ध असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीवरून राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून संभ्रमाची परिस्थिती आहे.
याविषयी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, स्थानिक राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकांसह अग्रणी बँकेकडे पात्र शेतकऱ्यांची नेमकी यादी कोणती यासंदर्भात आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले होते. जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी अग्रणी बँकेने दिलेली यादी पक्षप्रमुखांकडे सादर केली.
एकूणच राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांच्या आकडेवारीवरून खुद्द बँकांकडे माहिती उपलब्ध नसल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आले. ही कोंडी फोडून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी येत्या १० जुलैपासून जिल्हा बँकांसमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन छेडण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिला आहे.
जिल्ह्यातील बँकांनी यापूर्वी एक-एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम अदा केली असताना, यंदा पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत घसरण झाली कशी,असा प्रश्न उपस्थित होतो. बँकांकडे शेतकऱ्यांची अचूक आकडेवारी का उपलब्ध नाही. एकूणच पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न देण्याचे कटकारस्थान दिसून येते. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार जिल्हा बँकेसमोर १० जुलैपासून आंदोलनाची सुरुवात केली जाईल.
-नितीन देशमुख,
जिल्हाप्रमुख शिवसेना