विदर्भ काबीज करण्यासाठी शिवसेनेची रणनीती
By admin | Published: July 1, 2017 12:42 AM2017-07-01T00:42:52+5:302017-07-01T00:42:52+5:30
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १० जुलैनंतर अकोल्यात
आशिष गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भात भाजपाला ‘ब्रेक’ लावून पक्षाची भक्कमपणे पाया उभारणी करण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावर रणनीती आखल्या जात आहे. यासाठी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून, मे व जून महिन्यात पश्चिम विदर्भाचा दौरा केल्यानंतर पुन्हा एकदा १० जुलैनंतर उद्धव ठाकरे अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. यावेळी ते पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरून बिनसलेल्या शिवसेना व भाजपमधील दरी कमी होण्याऐवजी अधिकच रुंदावल्याचे चित्र आहे. २०१४ नंतर राज्यात पार पडलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी युती न करता स्वबळावर लढणे पसंत केले. राज्य सरकारमध्ये भाजपाला शिवसेनेची साथ असली, तरी विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा भाजपाला शिवसेनेच्याच तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्ती मिळावी, यासाठी शिवसेनेने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. कर्जमुक्तीच्या विषयावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत शिवसेनेने राज्यभरात शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला. विदर्भात भाजपाचे वाढते प्रस्थ लक्षात घेता शिवसेना नेतृत्वाने पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसंपर्क अभियानाला मराठवाड्यातून सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १५ मे रोजी पश्चिम विदर्भातील अकोल्यात पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतला होता. एक महिना उलटत नाही, तोच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ जून रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. त्यावेळीसुद्धा शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला होता. यादरम्यान राज्य सरकारने वेगवेगळे निकष लागू करून कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफी व त्याचे निकष पाहता आपण समाधानी नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांना कर्जमाफीबद्दल विचारणा करणार असल्याची माहिती आहे.
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आता चक्क तिसऱ्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अकोल्यात दाखल होणार आहेत. १० जुलैनंतर अकोला, वाशिम, यवतमाळ व त्यानंतर अमरावती व पुन्हा अकोला जिल्ह्यात पक्षप्रमुख ठाकरे जाहीर सभांमधून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना संबोधित करतील.
शिवसेना भवनमध्ये बैठक
विदर्भातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याच्या मुद्यावर शुक्रवारी शिवसेना भवनमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षाचे नेते मनोहर जोशी, लीलाधर डाहाके, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खा. अनिल देसाई, खा.अरविंद सावंत तसेच अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते.