धक्कादायक...९० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सर्वसाधारण लक्षणेच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:09 AM2020-05-19T10:09:12+5:302020-05-19T10:12:25+5:30
१२६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून, त्यातील ९० टक्के रुग्णांना कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे नाहीत.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात १२६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून, त्यातील ९० टक्के रुग्णांना कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे सर्व रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेल्या चाचणीमध्ये आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २६१ वर पोहोचला असून, त्यातील १२२ रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे ५० वर्षाखालील असून, त्यांच्यात कोरोनाची कुठलीच लक्षण नसल्याची माहिती आहे. तर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या सौम्य लक्षणांसह हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच दिसून येत नसल्याने अकोलेकरांसाठी चिंताजनक बाब आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसिंग करुन नमुने घेतल्यामुळेच हे रुग्ण समोर आले आहेत.
गर्भवतींमध्येही कोरोनाचे लक्षणे नाहीत!
जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी आतापर्यंत पाच महिलांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाहीत. संबंधित महिला या कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या परिसरातून रुग्णालयात दाखल झालेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित केलेल्या कोरोनाबाधित महिला रुग्णांमध्ये कोरोना संदर्भातील कोणतीही लक्षणे आढळली नाहीत; मात्र संबंधित महिला या प्रतिबंधित क्षेत्रातून आल्यामुळे त्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ घेण्यात आले होते. यातील चार महिलांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ निघाले आहेत.
- डॉ. आरती कुलवाल,
वैद्यकीय अधीक्षिका,
जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.
सर्वोपचार रुग्णालयात दाखल ९० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत. तर उर्वरित रुग्ण वयोवृद्ध असून, त्यांना इतरही आजार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला