धक्कादायक : फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 10:52 AM2021-03-01T10:52:47+5:302021-03-01T10:55:42+5:30
CoronaVirus In Akola मागील २८ दिवसांत ४ हजार ३८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून फेब्रुवारीत कोरोनाचे रेकॉर्डब्रेक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. मागील २८ दिवसांत ४ हजार ३८४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ३१ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत फेब्रुवारीत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. यामध्ये प्रामुख्याने अकोला महापालिका कार्यक्षेत्रासह मूर्तिजापूर आणि अकोट तालुक्यात कोरोनाचा कहर दिसून आला. गत वर्ष सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक ३,४०३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते, मात्र त्यानंतर कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले होते. मृत्युदरही कमी होऊ लागला होता. दरम्यान दिवाळीची बाजारपेठ आणि त्यानंतर लग्नसमारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा होऊ लागला. जानेवारीत कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा सुरुवात झाली, मात्र त्याची खरी तीव्रता १५ फेब्रुवारीनंतर दिसून आली. फेब्रुवारी महिन्यात सप्टेंबरच्या तुलनेत मृतकांची संख्या ५० टक्क्यांनी कमी असली, तरी पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. गत महिनाभरात ४ हजार ३८६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन अकरा महिन्यांचा कालावधी लोटला असून, आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही या महिन्यात घटले आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास येत्या काळात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१५ फेब्रुवारीनंतर घातला धुमाकूळ
१ ते १५ फेब्रुवारी - १६ ते २८ फेब्रुवारी
एकूण रुग्ण - ८८१ - ३,५०५
मृत्यू - ८ - २३
बरे झालेले रुग्ण - ६२६ - ८७७
ॲक्टिव्ह - ९४७ - २८५८
केवळ ३४ टक्के रुग्णांनाच डिस्चार्ज
फेब्रुवारी महिन्यात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप कमी असल्याचे दिसून आले. महिनाभरात केवळ १५०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजेच गत महिनाभरात पॉझिटिव्ह आलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ३४ टक्के आहे. सप्टेंबर २०२० मध्ये ही स्थिती चांगली होती. सप्टेंबरमध्ये एकूण रुग्णांच्या ७२ टक्के म्हणजेच २४६९ एवढे रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
मृत्युदरावर नियंत्रण
सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात मृत्युदरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले. फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांत ३१ जणांचा बळी गेला. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा विचार केल्यास या महिन्यातील मृत्युदर केवळ ०.७० टक्के आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात ३६७ जणांचा बळी गेला असून, हा मृत्युदर २.२ टक्क्यांवर आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जवळपास एक टक्क्यांनी मृत्युदर घसरला आहे.