धक्कादायक : अकोल्यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 10:34 AM2021-05-29T10:34:16+5:302021-05-29T10:34:36+5:30

Corona Cases in Akola : ६ महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी उघडकीस आली.

Shocking: Six-month-old baby girl dies by corona in Akola | धक्कादायक : अकोल्यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू

धक्कादायक : अकोल्यात सहा महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनाने मृत्यू

googlenewsNext

अकोला : बालकांना कोरोनाचा धोका वर्तविण्यात येत असताना अकोल्यात एका ६ महिन्याच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी उघडकीस आली. चिमुकलीवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होते. सर्वात लहान वयात कोरोनाचा बळी गेल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या बालकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांमध्ये युवकांसोबतच बालकांचेही प्रमाण लक्षणीय आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अशातच अकोल्यात एका ६ महिन्यांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी समोर आली. ही सहा महिन्याची चिमुकली पिंजर येथील रहिवासी असून, गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर रॅपिड ॲंटिजन चाचणीमध्ये चिमुकलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. डॉक्टरांनी उपचारास सुरुवात केली, मात्र दोन तासातच त्या चिमुकलीची प्राणज्योत मालवली. या धक्कादायक प्रकारानंतर पालकांनी आपल्या चिमुकल्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.

जन्मापासूनच होता हृदयविकार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सहा महिन्याच्या त्या चिमुकलीला जन्मापासूनच हृदयविकार असल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांनी दिली. त्या चिमुकलीचे वजनही कमी हाेते. रुग्णालयात दाखल करताना बाळाची प्रकृती चिंताजनक होती.

 

बालकांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत

मागील पाच महिन्यात जिल्ह्यात ८०० पेक्षा जास्त बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी बहुतांश बालकांना सौम्य तर काहींना लक्षणेच नसल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता बालकांची विशेष काळजी करण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ६ महिन्याच्या चिमुकलीला गंभीर अवस्थेत सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चिमुकलीला जन्मापासूनच हृदयविकार होता. शिवाय वजनही कमी होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोविड चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारास प्रतिसाद न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. नागरिकांनी बालकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- डॉ. विनीत वरठे, बालरोगतज्ज्ञ, जीएमसी, अकोला

Web Title: Shocking: Six-month-old baby girl dies by corona in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.