संग्रामपूरच्या महिलेचे नागपुरात शोले स्टाइल आंदोलन
By admin | Published: December 11, 2015 02:44 AM2015-12-11T02:44:39+5:302015-12-11T02:44:39+5:30
अस्तित्व महिला संघटनेचा दारुमुक्तीसाठी लढा.
संग्रामपूर (जि. बुलडाणा): मातृतीर्थ बुलडाणा जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील अस्तित्व महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रेमलता सोनोने यांनी नागपूरमधील लक्ष्मीनगरस्थित पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेऊन त्यांना सायंकाळी सोडून दिले. गुरुवारी सकाळीच सात वाजता त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. नागपूर मंत्रालयापासून नजीकच असलेल्या लक्ष्मीनगर येथील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी हे आंदोलन केले. नागपूर येथील महिला पोलिसांनी त्यांना अटक करून नागपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाण्यात नंतर त्यांना नेण्यात आले. प्रारंभी २७ नोव्हेंबरला मुंबई येथे राज्यमंत्र्यांसोबत दारूबंदीसाठी मिटिंगसुद्धा झाली होती; परंतु शासनाने त्याबाबत निर्णय न घेतल्याने नागपूर येथे आमदार नीलमताई गोरे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील दारूबंदीसाठी लावलेल्या लक्षवेधीसंदर्भात चर्चा व भेटण्यासाठी प्रेमलता सोनोने ह्या गेल्या होत्या. शोले स्टाइल आंदोलनासंदर्भात निवेदनाची एक प्रत त्यांनी ९ डिसेंबर रोजी नागपूर येथील पोस्टेलाही सादर केली होती. दहा डिसेंबरला पोलिसांच्या नजरेपासून वाचण्यासाठी त्यांनी पहाटेच पाण्याची टाकी गाठली होती. पोलिसांना त्यांची भनक लागल्यानंतर पोलिसांनी नंतर अटक केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांना प्रतापनगर पोलिसांनी (नागपूर) नजरबंद करून ठेवले होते.