‘आॅनलाइन’मुळे दुकानदारांच्या विक्रीत ६० टक्क्यांपर्यंत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 03:24 PM2018-11-19T15:24:31+5:302018-11-19T15:25:54+5:30
अकोला : तरुण पिढीत आॅनलाइन पोर्टलवरून खरेदी करण्याची ‘क्रेझ’ वाढल्यामुळे पारंपरिक दुकानदारांच्या विक्रीत १० ते ६० टक्के घट झाल्याचे बाजारपेठेतील सर्वेक्षणात समोर येत आहे.
अकोला : तरुण पिढीत आॅनलाइन पोर्टलवरून खरेदी करण्याची ‘क्रेझ’ वाढल्यामुळे पारंपरिक दुकानदारांच्या विक्रीत १० ते ६० टक्के घट झाल्याचे बाजारपेठेतील सर्वेक्षणात समोर येत आहे. दिवाळीनंतर त्वरित अकोलाबाजारपेठेत ही तपासणी केली. याकरिता गृहोपयोगी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, मोबाइल फोन, तयार कपडे, कापड, गिफ्ट आर्टिकल्स, होम डेकोरेशन उत्पादने विकणाऱ्या दुकानदारांकडे चौकशी करण्यात आली. सगळ्याच दुकानदारांनी रेकॉर्डवर बोलण्यास नकार दिला; पण विक्री कमी झाल्याचे प्रत्येकाने खासगीत मान्य केले आहे.
आॅनलाइन पोर्टलचा सर्वाधिक फटका हेडफोन, ब्ल्यूटूथ, पेनड्राइव्ह व मोबाइल फोन विकणाºया दुकानदारांना बसला आहे. मोबाइल फोनची विक्री ५० ते ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे सर्व दुकानदारांचे म्हणणे आहे. यानंतर तयार कपड्यांचा क्रम लागल्याचे निदर्शनास आले. तयार कपड्यांची, विशेषत: पुरुषांची वस्त्रे उदा. शर्टस्, जीन्स, टी-शर्ट, कुर्ता-पायजमा, शेरवानी, सूट यांची विक्री ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे न्यू क्लॉथ मार्केटमधील अनेक दुकानदारांनी सांगितले. त्या तुलनेत महिलांच्या वस्त्र प्रावरणात फक्त टी-शर्टस्, जीन्स अशा उत्पादनांच्या विक्रीत २० ते ३० टक्के घट झाली आहे. प्रासंगिक वस्त्र प्रावरणे महिला दुकानदारांकडूनच घेतात, अशीही माहिती मिळाली. लहान मुलांच्या कपड्यांच्या बाबतीत ही विक्री ५ ते १० टक्के कमी झाली आहे.
याचबरोबर गृहोपयोगी वस्तू म्हणजे एअर कंडिशनर, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, वॉटर हिटर अशा उपकरणांच्या विक्रीतही १० ते २० टक्के घट झाल्याचे काही दुकानदारांनी सांगितले; मात्र यापैकी बहुतेक उत्पादने सुलभ मासिक हप्त्याने (ईएमआय) घेण्याकडे मध्यमवर्गीयांचा कल असल्याने विक्रीत फारशी घट झाली नसल्याचे अकोला बाजारपेठेतील दुकानदारांनी सांगितले. गिफ्ट द्यायच्या वस्तू व गृह सजावटीसाठी लागणाºया वस्तू उदा. वॉलपेपर, झुंबर, लायटिंग सामान यांच्या विक्रीत २० ते ३० टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. आॅनलाइन पोर्टलवर मालाचा पुरवठा वेळेवर असल्याने स्टॉक ठेवण्याचा प्रश्न नसतो. त्यामुळे रक्कम गुंतवावी लागत नाही म्हणून आॅनलाइन पोर्टल दुकानदारांपेक्षा स्वस्त किमतीत उत्पादने देऊ शकतात. शिवाय, प्रत्येक वस्तूचा पुरवठादार वेगळा असल्याने ग्राहकांना अधिक डिझाइन उपलब्ध असतात. पारंपरिक दुकानदारांना हे फायदे मिळत नाहीत.