ज्वारीशिवाय पातूर बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:42 AM2017-11-14T01:42:01+5:302017-11-14T01:42:15+5:30
खरीप पणन हंगाम योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पातूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने एकही दाणा ज्वारी नसताना ज्वारी खरेदी केंद्राचे काटापूजन सोमवारी दुपारी शासकीय गोदामात तहसीलदारांच्या हस्ते उरकून घेतले.
शिर्ला: खरीप पणन हंगाम योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पातूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने एकही दाणा ज्वारी नसताना ज्वारी खरेदी केंद्राचे काटापूजन सोमवारी दुपारी शासकीय गोदामात तहसीलदारांच्या हस्ते उरकून घेतले.
पातूर तालुक्यात तीन हजार हेक्टरवर हायब्रीड ज्वारीची पेरणी केली होती; मात्र कापणी, सोंगणीच्या ऐनवेळी पाऊस झाला. पावसाने संपूर्ण हायब्रीड ज्वारी काळी पडली. काळ्या ज्वारीची खरेदी न करण्याच्या अघोषित निर्णयामुळे पेरणी, कापणी, सोंगणीवर केलेला शेतकर्यांचा संपूर्ण खर्च गेला आहे. शासनाने तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने सोमवारपासून पातुरात खरीप पणन हंगाम २0१७-१८ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेची अंमलबजावणी सुरू केली. हायब्रीड ज्वारी, बाजरी, मका या धान्याचे केवळ एफएक्यू दर्जाचे धान्य स्वीकारल्या जाणार आहे. त्यामुळे तीन हजार हेक्टरवरील काळी ज्वारी शेतकर्यांच्या घरात पडून राहणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने एफएक्यू प्रतीचे धान्य शेतकर्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावर/बाजार समिती स्तरावर ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ७/१२,आधार कार्ड व बँकेच्या पासबुक झेराक्स घेऊन जावे लागणार आहे; मात्र अद्यापही पातूरच्या केंद्रावर कोणत्याही प्रकारची ऑनलाइन नोंदणी सुविधा नाही. त्याबरोबरच आद्र्रता मोजणी यंत्र नाही. खरेदी-विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने केवळ वांझोटी अंमलबजावणी केली असल्याची चर्चा शेतकरी वर्गात केली जात आहे.
ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी यांनी शासकीय गोदामात काटापूजन करून केले. यावेळी पुरवठा अधिकारी लोखंडे, खरेदी-विक्री संघ व्यवस्थापक अजय देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संजय भगत, गोदामपाल एन.एम. ढोके आदी उपस्थित होते.
खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी सुविधा त्याबरोबरच आद्र्रता मापक यंत्रणा उपलब्ध करावी अशी सूचना केली.
-डॉ.आर.जी. पुरी, तहसीलदार, पातूर