संचारबंदीतही दुकाने उघडी, व्यावसायिकांवर गुन्हे दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:25+5:302021-05-06T04:19:25+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेता शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन अकोट ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेता शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन अकोट शहरात होत असल्याचे उघडकीस आले. सकाळी ७ ते ११ या वेळात जीवनावश्यक वस्तू खरेदी -विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु या वेळांमध्ये नियमात नसलेले आणि व्यावसायिक दुकानाचे टाळे उघडून व्यवसाय करताना आढळून आले. अशा एकूण २५ व्यावसायिकांवर प्रत्येकी एक ते पाच हजार रूपयांप्रमाणे ४३ हजार ५०० रुपये एकूण दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापर न करणाऱ्या काही लोकांवर सुद्धा कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त अकोट शहर पोलीस स्टेशनमध्येसुद्धा कलम १८८ अंतर्गत उल्लंघन करणाऱ्या काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. सदरची कारवाई महसूल पोलीस व नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्तपणे केली आहे. शहरातील मुख्य जवाहर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणचे काय भाजीपाला व्यावसायिकांना, फळ विक्रेत्यांना इतर ठिकाणी प्रशासन जागा उपलब्ध करून देत आहे. शिवाय नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अनेक व्यवसायिकांच्या साहित्य जप्तीची मोहीमसुद्धा राबवली जात आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमाचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, स्वतः ची, कुटुबांची काळजी द्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार नीलेश मडके, नायब तहसीलदार हरीश गुरव, मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ, प्रभारी शहर पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष तोरणेकर यांनी केले आहे.