दुकाने दाेन वाजेपर्यंत सुरू, शनिवार, रविवार लाॅकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:14 AM2021-06-01T04:14:46+5:302021-06-01T04:14:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : जिल्ह्यात कोरोनाची साखळी ताेडण्याकरिता लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाचे फलित दिसत असले तरी, कोरोना ...

Shops open until 2 p.m., Saturday, Sunday lockdown | दुकाने दाेन वाजेपर्यंत सुरू, शनिवार, रविवार लाॅकडाऊन

दुकाने दाेन वाजेपर्यंत सुरू, शनिवार, रविवार लाॅकडाऊन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : जिल्ह्यात कोरोनाची साखळी ताेडण्याकरिता लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाचे फलित दिसत असले तरी, कोरोना रुग्णांचा पाॅझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या व उपलब्ध ऑक्सिजन बेड्‌स यांची स्थिती पाहता, जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंधांमधून दिलासा दिला आहे. १ जूनपासून दुकानांची वेळ सकाळी ७ ते दाेन वाजेपर्यंत करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक प्रतिष्ठानांचा समावेश आहे. मात्र बिगर अत्यावश्यक दुकाने ही शनिवार, रविवार पूर्णपणे बंद राहतील, असे आदेशात नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १ जूनच्या सकाळी सात वाजेपासून, तर १५ जूनच्या रात्री १२ पर्यंत नव्याने आदेश निर्गमित केले आहेत.

काेराेनाच्या साखळीला ब्रेक लावण्यासाठी लागू केलेल्या या निर्बंधांमध्ये लग्न, तसेच इतर साेहळ्यांवरील बंधने कायमच ठेवण्यात आली आहेत. दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना मालाची विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच दुपारी तीन वाजेनंतर कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्‍यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्‍यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

...............................

निर्बंधांसह सुरू ठेवण्‍यात आलेल्‍या अत्‍यावश्‍यक/ बिगर अत्‍यावश्‍यक सेवा...

१ सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दुकाने/किराणा/औषधी दुकाने/स्‍वस्‍त धान्‍य दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन

२ अकोला महानगरपालिका तसेच जिल्‍ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील बिगर अत्‍यावश्‍यक दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन (सोमवार ते शुक्रवार)

३ जिल्‍ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील बिगर अत्‍यावश्‍यक दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद

४ भाजीपाला व फळे विक्रीची दुकाने (द्वार वितरणासह) सकाळी सात ते दुपारी दोन

५ दूध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री (घरपोच दूधविक्री नियमित वेळेनुसार सुरू राहील.) (स्वीट मार्टची दुकाने वगळता) सकाळी सात ते दुपारी दोन, सायंकाळी पाच ते सात.

६ कृषी सेवा केन्‍द्र व कृषी निविष्‍ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगगृहे \ शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने. सकाळी सात ते दुपारी तीन

७ सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, बिगर बॅंकिंग वित्‍तीय संस्‍था, सूक्ष्‍म वित्‍त संस्‍था, सहकारी संस्था, पतपेढी संस्था, विमा, पोस्‍ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित असलेल्या सर्व वित्तिय संस्था. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळात सुरू राहतील.

८ पेट्रोलपंप/डिझेल/सीएनजी गॅस पंप सकाळी सात ते दुपारी दोन, त्‍यानंतर दुपारी दोन ते रात्री आठ या कालावधीत शासकीय/ मालवाहतूक, ॲम्‍ब्‍युलन्‍स इ. अत्‍यावश्‍यक वाहनांकरिता शेतकऱ्यांना त्‍यांच्‍या शेतातील कामे तसेच मालाची वाहतूक करण्‍याकरिता शहनिशा करून ट्रॅक्‍ट्रर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना पेट्राेल

९ एमआयडीसी व राष्‍ट्रीय महामार्ग व हायवेवरील पेट्रोल/ डिझेल पंप नियमित वेळेनुसार

१० रेस्‍टॉरन्‍ट, भोजनालय, उपाहारगृह सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत फक्‍त होम डिलिव्‍हरी सेवा पुरविण्‍यास परवानगी

११ कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती सकाळी सात ते दुपारी दोन

१२ शिवभोजन वेळेनुसार

१३ अकोला महानगरपालिका तसेच जिल्‍ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील CSC Centers.

१४ सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्‍थापना या कालावधीतही 25% कर्मचारी क्षमतेसह सुरू राहतील.

हे बंदच राहणार...

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे बंद राहतील

केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत. परंतु, ऑनलाईन शिक्षण सुरू राहील.

लग्न समारंभ, स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कला केंद्र, प्रेक्षकगृह, सभागृह बंद राहणार आहेत

लग्‍न समारंभ करावयाचा असल्‍यास तो साध्‍या पद्धतीने घरगुती स्‍वरूपात करावा. लग्‍नामध्‍ये मिरवणूक, बॅन्‍ड पथक यांना परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. लग्‍न समारंभाकरिता केवळ २५ व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍याची परवानगी असेल व लग्‍न सोहळा हा दोन तासापेक्षा जास्‍त चालणार नाही याची दक्षता घ्‍यावी लागेल.

वृत्तपत्रांचे वितरण पूर्ववत

सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील. वृत्तपत्रांची घरपोच सेवा करता येईल, तसेच वृत्‍तपत्र वितरणसंदर्भाने वाहतूक सुरू राहणार असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Shops open until 2 p.m., Saturday, Sunday lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.