दुकाने सांयकाळी सातपर्यंत ; लग्नात बाेलवा ५० वऱ्हाडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:52+5:302021-04-01T04:19:52+5:30

अकोला : लाॅकडाऊनच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दिलासा मिळाला आहेॉ गुरुवारपासून सर्व प्रकारच्‍या ...

Shops until seven in the evening; 50 brides at the wedding! | दुकाने सांयकाळी सातपर्यंत ; लग्नात बाेलवा ५० वऱ्हाडी !

दुकाने सांयकाळी सातपर्यंत ; लग्नात बाेलवा ५० वऱ्हाडी !

Next

अकोला : लाॅकडाऊनच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांना बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दिलासा मिळाला आहेॉ गुरुवारपासून सर्व प्रकारच्‍या सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्‍ठाने, दुकाने पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत सुरू राहतील. तसेच लग्नातील उपस्थितीवरचेही बंधन कमी करण्यात आले असून आता ५० वऱ्हाड्यांना लग्नाला हजेरी लावता येईल शिवाय आठवडी बाजारही पाच एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरी व ग्रामीण क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशात बुधवारी बदल केला आहे. बाजारपेठ सायंकाळी सातपर्यंत सुरू राहणार असून हाॅटेल, रेस्‍टॉरेन्‍ट यांचे किचन व स्‍वयंपाकगृह हे सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत फक्‍त घरपोच सेवा देण्‍याकरिता सुरू राहतील. सर्व सार्वजनिक जागा, बागबगिचे हे रात्री आठ ते सकाळी सहा या कालावधीत बंद राहतील. लग्‍न समारंभाकरिता केवळ ५० व्यक्तींना उपस्थितीची परवानगी राहील. (बॅण्डपथक व सांस्कृतिक पथकासह) तहसींलदारांकडून परवानगी आवश्यक ठेवण्यात आली आहे. अंत्यसंस्‍काराकरिता केवळ २० व्‍यक्‍तींना उपस्थित राहता येणाार असून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार हे दि. ५ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत कोविडच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्‍या खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब करून सुरू करण्‍यात येत आहेत. बाजारात कोविड-१९ च्या अनुषंगाने केन्‍द्र शासन व राज्‍य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्‍या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

बाॅक्स..

आधार केंद्र सुरू

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आधार केन्‍द्र कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित केलेल्‍या उपाययोजनेचा अवलंब करून ५० टक्के कर्मचारी क्षमतेसह पुढील आदेशापर्यंत सुरू राहतील.

असा राहील दंड

रात्रीच्या संचारबंदीच्या कालावधीत पाचपेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती आढळल्‍यास, रात्रीच्या संचारबंदीच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी व बगिच्‍यामध्‍ये वावरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्‍यक्‍तीवर एक हजार रुपये दंडाची रक्कम आकारली जाईल. दुकानदार, विक्रेता यांनी कोविडच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्‍या आदेशांचा भंग केल्यास संबंधित विक्रेत्यावर एक हजार रुपये दंड, चेहऱ्यावर मास्‍क न लावणाऱ्या व्‍यक्‍तीवर पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. लग्‍न समारंभ किंवा इतर समारंभाकरिता ५० पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती आढळल्‍यास प्रति व्‍यक्‍ती पाचशे रुपये व संबंधित कार्यालय, सभागृह, लॉन, इतर संबंधित जागेचे मालक यांना २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्‍यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांकरिता सील करण्‍यात येईल.

हे बंधनकारकच...

सर्व संबंधित व्यावसायिक, दुकानदार तसेच कामगार यांनी त्‍यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील. जी प्रतिष्‍ठाने, दुकाने, व्‍यवसाय येथील सर्व संबंधितांची कोविडची चाचणी निगेटिव्‍ह आली असेल अशाच प्रतिष्‍ठान, दुकान, व्यावसायिक यांना त्‍यांच्या आस्‍थापना सुरू ठेवता येईल, अन्‍यथा अशी प्रतिष्ठाने सील करण्‍यात येतील. तसेच त्‍यांचेवर दंडनीय कारवाईसुद्धा करण्‍यात येईल. विशेष म्हणजे आठवडी बाजारात व्‍यवसाय करणारे व्यावसायिक, दुकानदार, कामगार यांनी आपली दुकाने बाजारामध्‍ये लावण्‍यापूर्वी कोविड चाचणी करणे बंधनकारक राहील. कोविड चाचणीचा निगेटिव्‍ह रिपोर्ट सोबत असल्‍याशिवाय बाजारात दुकान लावता येणार नाही.

रात्रीची जमावबंदी व संचारबंदी

संपूर्ण अकोला जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागामध्‍ये रात्रीचे आठ वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीची जमावबंदी व संचारबंदी ( Night Curfew) लागू करण्‍यात येत आहे. संचारबंदीच्‍या आदेशाच्या अनुषंगाने कोणत्‍याही व्‍यक्‍ती, नागरिकांना हालचाल करण्‍याकरिता, जमा व एकत्रित येण्‍याकरिता सक्‍त मनाई करण्‍यात आली आहे.

Web Title: Shops until seven in the evening; 50 brides at the wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.