सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरुग्ण वॉर्डात शॉर्ट सर्किट; पालकांची पळापळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:00 PM2019-11-30T13:00:29+5:302019-11-30T13:01:05+5:30

बालरुग्ण विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

A short circuit in the pediatric ward of hospital | सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरुग्ण वॉर्डात शॉर्ट सर्किट; पालकांची पळापळ!

सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरुग्ण वॉर्डात शॉर्ट सर्किट; पालकांची पळापळ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील बालरुग्ण वॉर्ड क्रमांक २३ मध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. शॉर्ट सर्किटमुळे वॉर्डात धूर झाल्याने बालरुग्णांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एकच पळापळ झाली होती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २३ हा स्वतंत्र बालरुग्णांचा वॉर्ड आहे. वातावरणातील बदलांमुळे सध्या वॉर्डात बालरुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे वॉर्डात रुग्णांसह नातेवाइकांचीही गर्दी आहे. वॉर्डात नेहमीप्रमाणे बालरुग्ण व पालकांची गर्दी असताना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली.
शॉर्ट सर्किटमुळे वॉर्डात जळण्याचा वास तसेच धूर झाल्याने बालरुग्णांसह पालकांमध्ये एकच खळबळ उडाली अन् धावपळीला सुरुवात झाली. या धावपळीमुळे बालरुग्ण विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर इलेक्ट्रिशियनला बोलावण्यात आले व परिस्थिती नियंत्रणात आणली.

जवळच ‘एसएनसीयू’ कक्ष
वॉर्ड क्रमांक २३ जवळच एसएनसीयू कक्ष आहे. या कक्षात गंभीर बालकांवर उपचार करण्यात येतो. शुक्रवारी झालेल्या घटनेमुळे या कक्षातील बालरुग्णांनाही धोका निर्माण झाला होता; परंतु बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीत वरठे यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वॉर्ड क्रमांक २३ मध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला होता. सतर्कता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणल्या गेली. कुठल्याही रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाइकांना इजा झाली नाही.
- डॉ. विनीत वरठे,
बालरोग तज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

Web Title: A short circuit in the pediatric ward of hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.