तेल्हारा तालुक्यात कोविड १९ लसीकरणाला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:26+5:302021-04-14T04:17:26+5:30
प्रशांत विखे तेल्हारा: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, तालुक्यातील रुग्णसंख्या ८३ वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे लसीकरणावर ...
प्रशांत विखे
तेल्हारा: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, तालुक्यातील रुग्णसंख्या ८३ वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र, तालुक्यातील नागरिकांचा लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून तालुक्यासह शहरात लसीकरणला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक किंवा ‘फ्रन्ट लाइन’वर काम करणाऱ्यांना कोविड १९ लस देण्यात आली. सध्या ४५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात ४०० लस उपलब्ध असून, रोज केवळ ८० ते १०० नागरिकांचे लसीकरण होत आहे. ग्रामीण भागातील पंचगव्हाण, दानापूर, हिवरखेड, अडगाव या केंद्रांत १५० लस दिल्या जात असून, सरासरी केवळ २५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण होत आहे. लसीकरण सतत सुरू असताना, दीड महिन्यांत केवळ दहा ते पंधरा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १० टक्केच नागरिकांचे लसीकरण झाल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रामुख्याने जास्तीतजास्त ६० वर्षांवरील वयोगटांतील नागरिक व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतर लसीकरण केंद्रात लसीचा तुटवडा असताना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे तालुक्यात लस उपलब्ध असूनही नागरिक अल्प प्रतिसाद मिळत असल्याने, लसीकरण बाबतीत अजूनही काही गैरसमज आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी व जास्तीतजास्त लसीकरण करून घेण्याची मागणी होत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ८३ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी जास्तीतजास्त लसीकरण होणे गरजेेचे आहे.
--------------------------------------
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद नाही!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले असताना, या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
-----------------------------
कोविड १९ लस पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी कुठलाही गैरसमज न ठेवता लसीकरण पूर्ण करावे. शासनाच्या नियमांचे पालन करीत सहकार्य करावे.
- डॉ.संतोष येवलीकर, तहसीलदार, तेल्हारा