पातूर तालुक्यात लसीकरणाला अल्प प्रतिसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:15 AM2021-04-03T04:15:40+5:302021-04-03T04:15:40+5:30
संतोष कुमार गवई पातूर : कोविड प्रतिबंधात्मक लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. राज्यात लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ...
संतोष कुमार गवई
पातूर : कोविड प्रतिबंधात्मक लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. राज्यात लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आता ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोविडची लस घेता येत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहेत. या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, तालुक्यातील लसीकरण केंद्रात २४०९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोविड लसीकरणाबाबत तालुक्यात काही मंडळी नागरिकांमध्ये चुकीचे गैरसमज पसरवीत आहेत. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता; मात्र नागरिकांचे लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करीत आरोग्य विभागाने तालुक्यात जनजागृती सूरू केली आहे. तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीचे कोणतेही दुष्परिणाम नसून, ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येणाचे आवाहन करण्यात येत आहे. तालुक्यात आतापर्यंत २ हजार ४०९ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या १ एप्रिलपासून तालुक्यातील १७ आरोग्य उपकेंद्रावरही ही सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------
अशी आहे तालुक्याची स्थिती
पातूर तालुक्याची लोकसंख्या १ लाख ३२ हजार आहे. आतापर्यंत केवळ २ हजार ४०९ लोकांनी कोविडची लस घेतली असल्याचे वास्तव आहे. लोकसंख्येच्या विचार करता आतापर्यंत किमान २५ टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक होते. मात्र केवळ अफवा आणि गैरसमजातून तालुक्यातील लसीकरण मोहीम मंदावल्याचे चित्र आहे.
---------------------------------
येथे सुरू आहे लसीकरण
तालुक्यातील शिर्ला, खानापूर, माळराजूरा, पातूर, पातूर कोविड सेंटर, बाभूळगाव, तांदळी, विवरा, आलेगाव, अंबाशी, चरणगाव, पिंपळडोळी, चोंढी, मळसूर, सस्ती, जनुना, पिंपळखुटा येथे लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
--------------------------------------------------------------
कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती निश्चितच वाढेल. तो आणखी सुरक्षित होईल. त्यामुळे ४५ वर्षावरील प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे.
- डॉ. विजय रामसिंग जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, पातूर
---------------------
नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लसीकरणासाठी पुढे यावे. उलट कोविड लसीमुळे सुरक्षितता वाढली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणाचा अस्त्र म्हणून वापर होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गावातील सुशिक्षित युवकांनी जनजागृती करावी.
- डॉ. चिराग रेवाळे, वैद्यकीय अधिकारी, पातूर.