तेल्हारा तालुक्यात कोविड-१९च्या लसीचा तुटवडा! (सद्य:स्थितीत ग्रामीण भागात ९३ तर शहरात ३७ असे एकूण १३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत... ९३ अधिक ३७ केले तर १३० होतात ना? कृपया आकडेवारी पाहून घेणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:18 AM2021-04-18T04:18:29+5:302021-04-18T04:18:29+5:30
तेल्हारा : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. ...
तेल्हारा : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. तालुक्यातील लसीकरण केंद्रात लस देणे सुरू आहे; मात्र लसीकरण केंद्रात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.
शहरासह ग्रामीण भागात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. दर तीन दिवसांत ५० कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. सद्य:स्थितीत तेल्हारा शहरात ३७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी तालुक्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. दुसरीकडे शहरात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण कमी झाल्याचे चित्र आहे. आता कोरोनाचे थैमान सुरू असल्याने नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असेल, त्यांची दुसरा डोस घेण्यासाठी धावपळ होत आहे. लसीकरण केंद्रात गर्दी होत असल्याने तालुक्यातील बऱ्याच केंद्रांत लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील आडगाव, हिवरखेड, पंचगव्हाण, दानापूर या चारही लसीकरण केंद्रांत लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. याकडे शासनाने लक्ष देऊन लस उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------------
तालुक्यातील रुग्णसंख्या १३७ वर!
शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात ९३ तर शहरात ३७ असे एकूण १३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात नागरिक बेफिकीर असून, विनामास्क वावर करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
----------------------------
जिल्ह्यातील केंद्रातच लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येईल. नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
- डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार, तेल्हारा.