मूर्तिजापूर तालुक्यात महाबीज बियाण्यांचा तुटवडा; खरीप पेरणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:23+5:302021-06-17T04:14:23+5:30

तालुक्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला, परंतु तालुक्यातील काही भागांतच पेरणी योग्य पाऊस झाला आहे, तरीही शेतकरी ...

Shortage of Mahabeej seeds in Murtijapur taluka; Kharif sowing begins | मूर्तिजापूर तालुक्यात महाबीज बियाण्यांचा तुटवडा; खरीप पेरणीला सुरुवात

मूर्तिजापूर तालुक्यात महाबीज बियाण्यांचा तुटवडा; खरीप पेरणीला सुरुवात

Next

तालुक्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला, परंतु तालुक्यातील काही भागांतच पेरणी योग्य पाऊस झाला आहे, तरीही शेतकरी खरीप पेरणीसाठी सरसावले आहेत.

मूर्तिजापूर, कुरुम, शेलू बाजार मंडळात आतापर्यंत ७५ मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागत तातडीने आटोपून पेरणीला सुरुवात केली असली, तरी संपूर्ण तालुक्यात आतापर्यंत केवळ ६८ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. आवश्यकतेनुसार संपूर्ण तालुक्यासाठी ३ हजार ५०० क्विंटल महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु ३ हजार १०० क्विंटल महाबीज बियाणे पुरविण्यात आले असल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे, तर खासगी कंपनीच्या ८ हजार ८०० क्विंटल मागणीनुसार पूर्तता झाली असली, तरी बाजारात सद्यस्थितीत कमी प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. भविष्यात महाबीज बियाणे बाजारात उपलब्ध होण्याची आशा मावळली असल्याने, शेतकऱ्यांनी घरचे बियाणे उगवण शक्ती प्रक्रिया तपासून घेऊन व बीज प्रक्रिया करून बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. सद्यस्थितीत बाजारात महाबीज वगळता, इतर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे केवळ ६०० क्विंटल बतियाने बाजारात उपलब्ध आहे. पिकांसाठी आवश्यक असलेले सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने, शेतकऱ्यांची खताची चिंता मिटली आहे. हल्ली कुठलेही खत उपलब्ध आहे. एकूण ३ हजार टन खतसाठा आजमितीस आहे, तर त्या डीएपी ३७५ मेट्रिक टन असल्याने, शेतकऱ्यांची खतांची चिंता मिटली असली, तरी महाबीजचे बियाणे १२ टक्केच उपलब्ध झाल्याने व इतर बियाण्यांच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्याने महाबीज बियाण्याची वाणवा होत आहे.

सोयाबीन, कपाशी, तुरीचा पेरा वाढणार

गतवर्षीच्या तुलनेत मूर्तिजापूर तालुक्यात यंदा सोयाबीन पिकाचा पेरा वाढणार आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, ३७ हजार २५६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. १७ हजार ७३६ हेक्टरवर कपाशी, १० हजार ६११ हेक्टरवर तूर, ५ हजार ३७६ हेक्टरवर मूग व ५४३ हेक्टरवर उडदाची लागवड होण्याचा अंदाज आहे. तालुक्यात सर्वात कमी १ हजार ८६५ हेक्टरवर ज्वारीची लागवड होण्याचा अंदाज आहे.

बियाण्यांचा तुटवडा; दुबार पेरणीचे संकट टाळा

बाजारात सोयाबीन बियाण्याची सुरुवातीलाच चणचण जाणवत असून, बाजारात मोजके बियाणे उपलब्ध आहे. पेरणी योग्य पाऊल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता, मुबलक पावसानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. पेरणी योग्य पाऊस न झाल्यास पेरणी लुटण्याची दाट शक्यता असते. पेरणी उलटू नये, याची खबरदारी शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक असून, पेरणी उलटली तर दुबार पेरणीचे संकट आले, तर बाजारात बियाणे उपलब्ध राहणार नाही.

बियाणे ठेवा थोडे शिल्लक

शेतकऱ्यांनी बाजारात बियाणे खरेदी केले आहेत. त्या बियाण्याची उगवण शक्ती तपासून घेणे गरजेचे असून, घरी बीज प्रक्रिया करावी, जेणेकरून उगवणीस चांगली मदत होईल. त्याबरोबर, बॅगचे बियाणे असल्यास बॅगचे ‘लेबल’ कायम ठेवून बॅग खालच्या बाजूने फोडावी व त्यातील थोडे बियाणे शिल्लक ठेवावे. बियाणे उगवले नाही, तर जेणेकरून भविष्यात बियाणे कंपनीसोबत लढा देणे शक्य होईल.

बियाणे प्रक्रिया व बियाणे उगवणशक्ती तपासणीची प्रात्यक्षिके ग्रामीण विभागात देण्यात आली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी, तसेच ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळावे.

- अमृता काळे

तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर

सद्यस्थितीत खासगी कंपनीचे बियाणे बाजारात उपलब्ध आहेत, महाबीजकडून केवळ १२ टक्केच बियाणे उपलब्ध झाले. त्यातल्या त्यात इतर बियाण्यांच्या किमतीत महाबीज शेतकऱ्यांना परवडणारे असल्याने, महाबीज बियाण्यांचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांना लागणारे सर्व प्रकारची खते उपलब्ध आहेत.

- गोपाल बोंडे, कृषी अधिकारी पंचायत समिती, मूर्तिजापूर.

Web Title: Shortage of Mahabeej seeds in Murtijapur taluka; Kharif sowing begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.