वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:23 AM2021-09-12T04:23:53+5:302021-09-12T04:23:53+5:30
राहुल सोनोने वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात ॲन्टी रेबिज लसीसह अनेक औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय ...
राहुल सोनोने
वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात ॲन्टी रेबिज लसीसह अनेक औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
येथे मागील पंधरा दिवसांपासून कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनेत वाढ झाली आहे, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील आठ दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील गावांतील ग्रामस्थांची गर्दी वाढली आहे. व्हायरल फ्लूच्या साथीमुळे आरोग्य केंद्रात रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र, खोकल्यासाठी कप सीरप औषधीचा तुटवडा दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथे तामशी, चिंचोली गणू, पिंपळगाव, देगाव, धनेगाव, नकाशी आदी गावांतील ग्रामस्थ उपचारासाठी येतात. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन औषधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मोहनसिंग लोध, अंकुश शहाणे, राहुल संगोकार, सुश्रुत भुस्कुटे आदींनी केली आहे.
----------------------
रेबीज लसीच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन औषध उपलब्ध करावी.
- राजेश्वर पळसकार, ग्रा.पं. सदस्य, वाडेगाव.
--------------------------
मला कुत्र्याने चावा घेतला होता. उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो असता, रेबिज लस मिळाली नाही. नाईलाजाने बाहेर जावे लागले आहे.
- प्रकाश मसने, ग्रामस्थ, वाडेगाव.