खाटा कमी; बाळंतीण महिला मात्र जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:09 AM2017-08-14T01:09:53+5:302017-08-14T01:16:26+5:30
अकोला : जिल्हय़ात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांडच होत असल्याचे चित्र आहे. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाचीही परिस्थिती वेगळी नसून, या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणार्या गरोदर महिला आणि उपलब्ध खाटा यांचे प्रमाण व्यस्त आहे. रुग्णालयात खाटांची संख्या ३00 आहे, तर त्या तुलनेत ३५0 ते ३७0 गरोदर महिला दाखल होतात. परिणामी दाखल होणार्या उर्वरित गरोदर महिलांची या ठिकाणी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पूर्वाश्रमीचे लेडी हार्डिंग रुग्णालयाचे नामकरण आता जिल्हा स्त्री रुग्णालय झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत या रुग्णालयातील खाटांची व कक्षांची संख्या वाढली असून, सूश्रुषेचा दर्जाही सुधारला आहे. त्यामुळे जिल्हाभरातून प्रसूतीसाठी येणार्या गरोदर महिलांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. वर्ष २00९-१0 मध्ये या रुग्णालयात १0 हजार महिलांचे बाळंतपण व्हायचे, आता ही संख्या १७ हजारांच्या घरात गेली आहे.
त्या तुलनेत येथील पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली नाही. रुग्णालयात आठ कक्ष, दोन प्रसूती कक्ष, कुपोषित बालकांसाठी एक कक्ष आणि विशेष नवजात शिशू दक्षता केंद्र आहे. रुग्णालयाची क्षमता ३00 खाटांची आहे; परंतु येथे दररोज ३५0 ते ४00 पर्यंंत महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. त्यामुळे अतिरिक्त महिलांना खाटा उपलब्ध होऊ शकत नाहीत.
जिल्हाभरातील महिलांसाठी असलेल्या या रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णालयात डॉक्टरपासून ते परिचारिका व सफाई कामगारांपर्यंतची ४४ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरल्यास रुग्णसेवेचा दर्जा वाढण्यास मदतच होईल.
नवीन वास्तूचे काम प्रगतिपथावर
जिल्हा स्त्री रुग्णालायाचा विस्तार होणार असून, आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात नवीन वास्तूचे काम सुरू आहे. त्यामध्ये २0 खाटांचे नवीन केंद्र सुरू होणार आहे. नवीन इमारत उपलब्ध झाल्यानंतर ही समस्या दूर होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.