वरूर जऊळका येथे लसींचा तुटवडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:58+5:302021-05-05T04:29:58+5:30
वरूर जऊळका: कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारा वरूर जऊळका येथे लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने १८ वर्षांवरील युवकांना लसची प्रतीक्षा ...
वरूर जऊळका: कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारा वरूर जऊळका येथे लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने १८ वर्षांवरील युवकांना लसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारतर्फे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला फ्रंटलाइन वर्कर, त्यानंतर ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत होती. आता दि. १ मेपासून १८ वर्षांवरील युवकांना लस देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुषंगाने येथील युवक लसीकरणासाठी केंद्रात जात आहेत; मात्र लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यांना परतावे लागत आहे.
परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत होती; मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन लस उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोरोना लस उपकेंद्रात देण्यात यावी!
येथील ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस आयुर्वेदिक रुग्णालयात देण्यात येत आहे. रुग्णालय गावापासून दूर असल्याने नागरिकांना याबाबत माहिती होत नाही. तसेच लसीकरणासाठी खूप दूर जावे लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन लसची सुविधा उपकेंद्रात करण्याची मागणी युवकांसह ग्रामस्थांकडून होत आहे.