समाजप्रबोधनासाठी लघुचित्रपट प्रभावी माध्यम- रणजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:39 PM2018-12-28T12:39:58+5:302018-12-28T12:41:17+5:30
अकोला: संस्कृती जपण्यासाठी, संस्कृती पुढे नेण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी लघुचित्रपट हे प्रभावी माध्यम ठरतील, असे मत गृहमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केले.
अकोला: संस्कृती जपण्यासाठी, संस्कृती पुढे नेण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी लघुचित्रपट हे प्रभावी माध्यम ठरतील, असे मत गृहमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केले.
विदर्भातील पहिले चित्रपट निर्माते डॅडी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी आयोजित पहिल्या डॅडी देशमुख लघुचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ. रणजित पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम सिनेदिग्दर्शक राजदत्त होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक पद्मश्री कल्पना सरोज, नीलिमा देशमुख-भोसले, लोककवी विठ्ठल वाघ, आयोजन समिती प्रमुख प्रा.तुकाराम बिडकर, विजय देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भातील चित्रपट निर्माते प्राचार्य शत्रुघ्न बिडकर, प्रशांत मानकर, वंदना वानखडे, नीलेश जळमकर, नरेन भुतडा, डॉ. दीपक मोरे, राधा बिडकर, उमेश जाधव, संजय शर्मा, गणेश पाटील, विनोद जैन, प्रशांत देशमुख, शैलेंद्र पारेख, सदाशिव शेळके विराजमान होते.
डॉ. पाटील म्हणाले की, ज्या काळात विदर्भामध्ये चित्रपटाबाबत सामान्य मनुष्य विचारही करू शकणार नाही, अशा काळात डॅडी देशमुख यांनी अजरामर चित्रपटांची निर्मिती केली. अनेक दिग्गज कलावंत चित्रपटसृष्टीला दिले. शिक्षण, राजकीय, सामाजिक क्षेत्रातदेखील डॅडींनी योगदान दिले; मात्र सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी इतिहास रचला. प्रा. बिडकर यांनी आपल्या प्रास्ताविकात, पुढील वर्षापासून चित्रपट महोत्सव अकोल्यात घेतल्या जाणार असल्याचे घोषित केले. यावेळी डॅडी देशमुख यांच्या कन्या नीलिमा देशमुख-भोसले आणि कल्पना सरोज यांनी आपल्या मनोगतामध्ये महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
महोत्सवामध्ये १३० प्रवेशिका
पहिल्याच वर्षी महोत्सवाला १३० प्रवेशिका प्राप्त झाल्या. मुंबई, अकोला, पुणे, वर्धा, तळेगाव दाभाडे, सोलापूर येथून अधिक प्रवेशिका मिळाल्या. त्यापैकी निवड झालेले १५ लघुचित्रपट स्क्रीनवर दाखविण्यात आले. त्रसदी, दि ड्रेनेज, अ डाउटिंग ट्र्युथ, जरीवाला आसमान, दृष्टिकोण, पोकळी, फर्स्ट रेन, दि लॉस्ट, नाझा का आलम, दि होली काउ, सुपिरो दि होप, मसानखायी, आजीचा चष्मा, खेळ मांडला, स्पायडरमॅन टु फेसेस हे चित्रपट पाहून प्रेक्षकांचे मन सुखावले.