तेल्हाऱ्याच्या कृषी केंद्र चालकाला कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 AM2021-06-05T04:14:29+5:302021-06-05T04:14:29+5:30
मागील वर्षी जिल्ह्यात सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. बहुतांश शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ...
मागील वर्षी जिल्ह्यात सोयाबीन बियाणांच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. बहुतांश शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. यावर जिल्ह्यातील ८ हजार शेतकऱ्यांनी बियाणांच्या उगवणविषयी तक्रारी दिल्या होत्या. यामध्ये काही बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. यंदा सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवत आहे. त्यातही काही कृषी केंद्र चालक सोयाबीन बियाणांच्या जबाबदारीतून बाहेर निघण्याचा प्रकार करीत आहेत. बियाणे खरेदी केलेल्या बिलावर बियाणे विक्रेते ‘सदर सोयाबीन बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे, तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईन’, असा शिक्का मारल्याचा प्रकार तेल्हारा तालुक्यात घडला. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून त्याची कोणतीही जबाबदारी न घेण्यासारखा आहे. त्यामुळे या कृषी सेवा केंद्र चालकाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे.
तेल्हारा येथील कृषी सेवा केंद्र चालकाला नोटीस बजावली आहे. कोणत्याही कृषी सेवा केंद्राची गय केली जाणार नाही. असा प्रकार घडल्यास कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
- डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी