‘एसएमएस’ दाखवा, वीज बिल भरा!

By admin | Published: July 6, 2017 01:34 AM2017-07-06T01:34:30+5:302017-07-06T01:34:30+5:30

महावितरणची ‘पेपरलेस’कडे वाटचाल : वीज ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली सुविधा

Show 'SMS', pay the electricity bill! | ‘एसएमएस’ दाखवा, वीज बिल भरा!

‘एसएमएस’ दाखवा, वीज बिल भरा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वीज ग्राहकांना सर्व सेवा आॅनलाइन पुरविण्यावर भर देत असलेल्या महावितरणने वीज बिलासंदर्भातही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वीज बिलाबाबत महावितरणच्यावतीने ग्राहकांना मोबाइलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. वीज देयक न मिळण्याच्या वाढत्या समस्यांवर उपाय म्हणून घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे महावितरणचे ‘पेपरलेस’ व्यवहाराच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
वीज ग्राहकांना विविध सुविधा आॅनलाइन देण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून महावितरणकडून वीज बिलाची माहिती व इतर सुविधा मोबाइलवर देण्यात येत आहेत. राज्यभरातील सुमारे १ कोटी ३९ लाख वीज ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. या ग्राहकांना महावितरणच्या वीज बिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाइलवर पाठविण्यात येतो. या एसएमएसमध्ये ग्राहक क्रमांक, वीज बिलाची रक्कम तसेच वीज बिल भरण्याची अंतिम तारीख याचा समावेश असतो. राज्यभरातील अशा ग्राहकांना आता मोबाइलवरील एसएमएस दाखवून महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रात वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा महावितरणचा प्रयत्न असून, एसएमएसद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

मोबाईल क्रमाकांची नोंदणी करा !
वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदविण्यासाठी मोबाइलमध्ये ‘एमआरईजी’ हा शब्द कॅपिटलमध्ये टाइप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा व ९२२५५९२२५५ या क्रमांकावर पाठवून द्यावा, तसेच १८००२३३३४३५/१८००२००३४३५ व १९१२ या टोल फ्री क्रमांकावरही नोंदणी करता येते. महावितरणचे संकेतस्थळ,. मोबाइल अ‍ॅपवरही नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

जिल्ह्यात दीड लाख ग्राहकांनी केली नोंदणी
महावितरणचे मोबाइल अ‍ॅप डाउनलोड केलेल्या ग्राहकांसाठीही मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे आहे. यामुळे मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याकडे वीज ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. अकोला परिमंडळांतर्गत अकोला जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार वीज ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.

Web Title: Show 'SMS', pay the electricity bill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.