कोरोनाच्या सावटातही राजराजेश्वराला जलाभिषेकाची परंपरा अखंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 04:37 PM2020-08-17T16:37:22+5:302020-08-17T16:37:37+5:30
सकाळी साडेसात वाजता पालखी श्री राजेश्वर मंदिरात येताच भाविकांनी ‘जय भोले, हर हर महादेव’चा जयघोष केला.
अकोला: कोरोना विषाणूच्या सावटातही शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्याची परंपरा यंदा कायम ठेवण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू तसेच जिल्हा प्रशासनाच्या विनंतीला मान देत श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाची एकमेव मानाची पालखी ‘जय भोले’च्या गजरात अतिशय शिस्तबध्द व शांततेने सोमवारी सकाळी ६ वाजता शहरात दाखल झाली. पोलिस बंदोबस्तात मार्गाक्रमण करीत सकाळी साडेसात वाजता पालखी श्री राजेश्वर मंदिरात येताच भाविकांनी ‘जय भोले, हर हर महादेव’चा जयघोष केला.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७६ वर्ष पूर्ण होत आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी शहराच्या कानाकोपºयातील शिवभक्त जय्यत तयारी करतात. परंतु यंदा संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या संकटामुळे हा सोहळा आयोजित न करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाला केली होती. हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातील भाविक शहरात दाखल होतात. शिवभक्तांच्या भावना लक्षात घेता ही धार्मिक परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशातुन यावर्षी केवळ श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाच्या मानाच्या पालखीला गांधीग्राम येथे जाण्यासाठी परवानगी देण्याच्या निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे शहरातील प्रमुख पालखी व कावड मंडळांनी स्वागत केले. त्यामुळे रविवारी 16 जुलैच्या रात्री निवडक 20 शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री राजेश्वराची पालखी गांधीग्रामकडे मार्गस्थ झाली होती. गांधीग्राम येथे पूर्णा नदीची तसेच मानाच्या पालखीची विधिवत पुजा-अर्चना केल्यानंतर राजेश्वर शिवभक्त मंडळाचे सदस्य वाहनाद्वारे सोमवारी सकाळी ६ वाजता अकोटफैल परिसरातील पाचमोरी येथे दाखल झाले. यावेळी उपस्थित पोलीसांनी पालखीचे स्वागत केले.