जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट; कोट्यवधींची उलाढाल ठप्प!
By रवी दामोदर | Published: February 26, 2024 07:41 PM2024-02-26T19:41:14+5:302024-02-26T19:43:01+5:30
सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाचही बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसून आला. दरम्यान व्यवहार बंद असल्याने जवळपास १२ ते १५ कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे.
अकोला : महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न पणन अधिनियममध्ये प्रस्तावित केलेल्या विधायेकातील सुधारणा शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापारी व इतर बाजार घटक तसेच बाजार समित्यांच्या अस्तित्वास बाधक ठरणार असल्याचे सांगत बाजार समितीमधील कामगारांनी सोमवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी कामकाज बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रतिसाद दिसून आला असून, सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील पाचही बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट दिसून आला. दरम्यान व्यवहार बंद असल्याने जवळपास १२ ते १५ कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये सुधारणा प्रस्तावित केलेल्या आहेत. प्रस्तावित विधेयकातील सुधारणा या शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापारी व इतर बाजार घटक तसेच बाजार समित्यांचे अस्तित्वास बाधक ठरणार असल्याने बाजार समितीमधील कामगारांनी सोमवारी कामकाज बंद ठेवणार असल्याचे निवेदन बाजार समितीला दिले होते.
शेतकरीही बाजार समितीकडे फिरकले नाहीत
सोमवारच्या एका दिवसाच्या बंदमुळे बाजार समितीत शेतमाल आला नाही. सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. व्यापाऱ्यांचे गाळे बंद होते. फक्त बाजार समिती आवारात यापूर्वी आलेला शेतमाल ठेवलेला दिसत होता. या बंदमुळे शेतकरीही बाजार समितीकडे फिरकले नाहीत. दरम्यान, तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने अकोला बाजार समितीत एका दिवसापूर्वी आलेल्या तूरीचे माप झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अकोट व मूर्तिजापूर बाजार समितीतील व्यवहार ठप्प होते.