क्रिकेट सामन्यावर सट्टाबाजी करणारे भावंडं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:57+5:302021-04-26T04:15:57+5:30
अकोला : इंडियन प्रीमियर लीग आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स व रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट ...
अकोला : इंडियन प्रीमियर लीग आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स व रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्ट्याची देवाण-घेवाण करणाऱ्या सिंधी कॅम्पधील दोन भावंडांना पोलीस अधीक्षक ची श्रीधर यांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाइल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्प येथील रहिवासी राजेश लक्ष्मणदास सुचवानी व कमलेश लक्ष्मणदास सुचवानी हे दोघेजण आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार चालवित असल्याची माहिती शहर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पाळत ठेवून सदर दोन भावंडांच्या घरी छापा टाकला. त्यांच्या घरातून टीव्ही, मोबाइलच्या साहाय्याने सट्टा लावण्यासाठीचे यंत्र एक रिमोट तसेच रोख रक्कम असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.