सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत आजपासून तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 11:55 AM2020-12-11T11:55:48+5:302020-12-11T11:57:12+5:30
Sickle Cel News जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती आणि तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
अकोला : सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत शुक्रवार, दि. ११ डिसेंबरपासून जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती आणि तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सप्ताहांतर्गत ३० वर्ष वयोगाटातील युवक-युवतींनी लग्नापूर्वीच सिकलसेलची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २०११-१२ पासून जिल्ह्यातील सर्वच आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली. सिकलसेल आजार कार्यक्रम हा जनतेमधील या आजाराचे प्रमाण शोधणे, जास्तीत जास्त लोकांची तपासणी करणे, सिकलसेल रुग्णांनी दुसऱ्या वाहक किंवा रुग्णाशी विवाह टाळावा यासाठी विवाहपूर्व समुपदेशन करणे, सिकलसेल रुग्णांना रुग्णालय स्तरावर परिणाम व नियमित उपचार उपलब्ध करून देणे, रुग्णालय स्तरावर मोफत औषधोपचार व समुपदेशन करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. गतवर्षी सप्ताहांतर्गत ५४ जणांना सिकलसेल असल्याचे आढळून आले होते. ही मोहीम जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालयात राबविण्यात येत आहे. यंदाही या मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले.
दहा वर्षात ९,७३१ रुग्णांचा शोध
सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गत दहा वर्षात जिल्ह्यातील सात लाख, ३९ हजार १४१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ९ हजार ७३१ जणांची तपासणी पॉझिटिव्ह आढळून आली असून, यातील ४०२० हे सिकलसेल वाहक, तर २०० सिकलसेलचे रुग्ण आहेत.
संशयित रुग्णांची ‘एचबी-इलेक्ट्रो फोरेसीस’ तपासणी
सिकलसेल रुग्ण शोधमोहिमेंतर्गत निदर्शनास येणाऱ्या संशयित रुग्णांची ‘एचबी- इलेक्ट्रो फोरेसीस’ चाचणी केली जाईल. या चाचणीनंतरच संबंधित व्यक्ती सिकलसेलचा रुग्ण आहे की, वाहक आहे याचे निदान होईल. या चाचण्या जिल्हा स्री रुग्णालयासह मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय, अकोट ग्रामीण रुग्णालय या तीन ठिकाणी केल्या जातात.