सिद्धेश्‍वर देशमुख हत्याकांड; तीन आरोपींना दुहेरी जन्मठेप

By admin | Published: February 28, 2017 02:04 AM2017-02-28T02:04:23+5:302017-02-28T02:04:23+5:30

चौथ्या सात वर्ष शिक्षा; पाचवा आरोपी निर्दोष

Siddheshwar Deshmukh massacre; Three accused have double life imprisonment | सिद्धेश्‍वर देशमुख हत्याकांड; तीन आरोपींना दुहेरी जन्मठेप

सिद्धेश्‍वर देशमुख हत्याकांड; तीन आरोपींना दुहेरी जन्मठेप

Next

अकोला, दि. २७- मलकापूरचे तत्कालीन सरपंच तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश्‍वर देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच चौथ्या आरोपीस सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून पाचव्या आरोपीची संशयावरून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातील एका आरोपीस २५ हजार रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला.
मलकापूर ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच सिद्धेश्‍वर देशमुख हे त्यांचे मित्र डिगांबर पाटील आणि अनिल अदनकार यांच्यासोबत २३ ऑगस्ट २0१३ रोजी मलकापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर असताना त्यांच्यावर मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कंड आणि नीलेश काळंके यांनी वाद घालत धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. या हल्लय़ानंतरही सिद्धेश्‍वर देशमुख यांनी मारेकर्‍यांच्या हातातून पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतर बल्लू मार्कंड याने देशमुख यांच्यावर चार गोळय़ा झाडल्या तर काळंकेने धारदार शस्त्रांनी हल्ला सुरूच ठेवला. यामध्ये सिद्धेश्‍वर देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या प्रकरणाची तक्रार अनिल रामभाऊ अदनकार यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कें ड, अविनाश सुरेश वानखडे, नीलेश काळंके, विष्णू नारायण डाबके आणि डिगांबर हरिभाऊ फाटकर, या पाच आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२, ३४१, १२0, ५0६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या हत्याकांडाचा तपास खदानचे तत्कालीन ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने १८ साक्षीदार तपासले. यामधील दोन प्रत्यक्षदश्री तर तीन अन्य साक्षीदार फितुर झाले; मात्र त्यानंतरही चारही आरोपींविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यावरून न्यायालयाने मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कंड, नीलेश काळंके आणि अविनाश वानखडे या तीन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर विष्णू नारायण डाबके याला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. डिगांबर फाटकर याची संशयावरून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातील बल्लू मार्कंड याला २५ हजार रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ अँड. विनोद फाटे यांनी कामकाज पाहिले. तर आरोपीच्या वतीने औरंगाबाद येथील अँड. लढ्ढा यांनी कामकाज पाहिले.

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे २२ दाखले

सिद्धेश्‍वर देशमुख हत्याकांड प्रकरणात प्रत्यक्षदश्री आणि मुख्य साक्षीदार असलेले अनिल अदनकार आणि डिगांबर पाटील हे दोघेही फितूर झाले. यासोबतच आणखी तीन प्रमुख साक्षीदारही न्यायालयात फितूर झाले; मात्र त्यापूर्वी या प्रत्यक्षदश्री साक्षीदारांनी पोलीस आणि न्यायाधीशांसमोर साक्ष दिल्याचा मुद्दा जिल्हा सहायक सरकारी वकील अँड. विनोद फाटे यांनी न्यायालयात प्रभावीपणे मांडला. एवढेच नव्हे, तर सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील अशा प्रकारच्या २२ प्रकरणांचे दाखले अँड. फाटे यांनी दिले. या २२ प्रकरणांच्या दाखल्यांवर आणि फाटे यांनी मांडलेली बाजू लक्षात घेता न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली.

दोन आरोपी कारागृहात तर तीन जामिनावर
या प्रकरणातील मोहन ऊर्फ बल्लू हरिभाऊ मार्कंड आणि नीलेश काळंके हे दोन्ही आरोपी गत तीन वर्षांपासून कारागृहात आहेत, तर विष्णू नारायण डाबके, डिगांबर हरिभाऊ फाटकर, अविनाश सुरेश वानखडे हे तीन आरोपी जामीनावर होते. फाटकर यांची निर्दोष मुक्तता झाली तर अन्य दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

देशमुख यांच्या पत्नीसह १८ साक्षीदार
सिद्धेश्‍वर देशमुख हत्याकांड प्रकरणात त्यांची पत्नी विद्या देशमुख यांनी आरोपी आणि सिद्धेश्‍वर यांच्यात वाद होतअसल्याचे न्यायालयात सांगितले. आरोपींनी देशमुख यांना जिवे मारण्याची वारंवार धमकीही दिल्याचे विद्या यांनी सांगितले. यासोबतच फितूर न झालेले १३ साक्षीदार जबानीवर कायम राहिले. १३ साक्षीदार आणि विद्या यांनी सांगितलेला घटनाक्रम आरोपींचाफास आवळण्यात मदतीचा ठरला.

न्यायालयात साक्षीदार फितूर झाले, त्यानंतरही या हत्याकांड प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून ठोसपणे बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाचे २२ दाखले दिले, तसेच सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडल्यानंतर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली.
- अँड. विनोद फाटे
जिल्हा साहाय्यक सरकारी विधीज्ञ

Web Title: Siddheshwar Deshmukh massacre; Three accused have double life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.