वीज अभियंत्यांचा स्वाक्षरी घोटाळा; हजेरी पत्रकावर आगाऊ स्वाक्षरी
By admin | Published: February 8, 2016 02:36 AM2016-02-08T02:36:33+5:302016-02-08T02:36:33+5:30
आगामी आठवड्यातील कार्यालयीन हजेरीच्या स्वाक्ष-या आधीच मारल्याचा प्रकार उघडकीस.
अकोला : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये विविध घोटाळ्य़ांची प्रकरणे ऐकायला मिळतात; परंतु एखादा अभियंता चक्क स्वाक्षरी घोटाळा करेल हे नवलच! असाच प्रकार जुने शहर स्थित महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात घडला असून, येथील सहायक अभियंता महाशयांनी आगामी आठवड्यातील कार्यालयीन हजेरीच्या स्वाक्षर्या आधीच मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महावितरण कंपनीमधील विविध घोटाळे समोर येत असतानाच जुने शहरातील शिवाजीनगर स्थित वीज उपकेंद्रात विचित्र घोटाळा समोर आला आहे. ह्यलोकमतह्णला मिळालेल्या माहितीनुसार, येथील सहायक अभियंता यांनी हजेरी पत्रकावर आगामी आठवड्याची उपस्थिती दर्शविण्यासाठी गत आठवड्यात स्वाक्षरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर वीज उपकेंद्रातील हजेरी पत्रकानुसार, सहायक अभियंता यांनी फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात सोमवार, ८ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या आठवड्याची उपस्थिती दर्शविण्यासाठी स्वाक्षरी केली आहे. येथील सहायक अभियंत्यांच्या या स्वाक्षरी घोटाळ्य़ामुळे आश्चर्य वाटत आहे. आठवडा सुरू होण्यापूर्वीच आगाऊ स्वाक्षरी करणार्या अभियंत्याशी व त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
हजेरी पत्रकावर खोडाखोड
वरिष्ठांकडून येथील कर्मचार्यांवर दबावतंत्राचा उपयोग होत असल्याचेदेखील हजेरी पत्रकावरून निदर्शनास येते. वीज उपकेंद्रातील या हजेरीपत्रकावर वरिष्ठांची आगाऊ हजेरी दिसून येते, तर इतर कर्मचार्यांच्या नावासमोरील रकान्यांमध्ये खोडतोड करण्यात आल्याचे दिसून येते.