अकोल्यात पोस्ट कोविडच्या १५ मुलांना ‘सिग्निफिकंट हार्ट डिसिज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:21 AM2021-08-26T04:21:46+5:302021-08-26T04:21:46+5:30

अकोला: कोरोनातून बरे झाल्यानंतर मोठ्यांसह लहानग्यांनाही पोस्ट काेविडचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अकोल्यातील १५ मुलांमध्ये सिग्निफिकंट ...

Significant heart disease in 15 children of Post Kovid in Akola! | अकोल्यात पोस्ट कोविडच्या १५ मुलांना ‘सिग्निफिकंट हार्ट डिसिज’!

अकोल्यात पोस्ट कोविडच्या १५ मुलांना ‘सिग्निफिकंट हार्ट डिसिज’!

googlenewsNext

अकोला: कोरोनातून बरे झाल्यानंतर मोठ्यांसह लहानग्यांनाही पोस्ट काेविडचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अकोल्यातील १५ मुलांमध्ये सिग्निफिकंट हार्ट डिसिज उद्भवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त एका मुलाला पॅरालिसिसची समस्याही उद्भवल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांनो मुलांना कोरोना होऊन गेला असेल, तर त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

लहान मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम असल्याने त्यांना कोरोनापासून किंवा कोरोनामुक्तीनंतरही धोका नाही, असा समज असेल तर सतर्क व्हा. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. लक्षणांवर वेळीच उपचार न घेतल्यास कोविडमुक्तीनंतर कावासाकी सिंड्रोम हा पोस्ट कोविड आजार होण्याचा धोका असतो. मध्यंतरी मुंबई, नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी कावासाकीचे रुग्ण आढळले होते. अकोल्यातही सुमारे ६० पेक्षा जास्त लहान मुलांमध्ये पोस्ट कोविडचे रुग्ण आढळून आले. यातील बहुतांश मुलांना किरकोळ समस्या उद्भवल्या होत्या, मात्र १५ मुलांना सिग्निफिकंट हार्ट डिसिज उद्भवल्याची माहिती बालरोग तज्ज्ञांनी दिली. या रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार झाले असून, बहुतांश बालरुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याव्यतिरिक्त सर्वोपचार रुग्णालयात दोन बालरुग्णांवर उपचार झाल्याची माहिती आहे. यापैकी एका रुग्णाला पॅरालिसिसची समस्या, तर दुसऱ्या रुग्णाला अंगावर पुरळची समस्या उद्भवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उपचारानंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

६० चिमुकल्यांचे झाले इको

मध्यंतरी शहरातील एका खासगी बाल रुग्णालयात पोस्ट कोविडच्या ६० चिमुकल्यांचे इको करण्यात आले. यापैकी सुमारे १५ चिमुकल्यांना ‘सिग्निफिकंट हार्ट डिसिस’ असल्याची माहिती समोर आली आहे. तर उर्वरित ४५ चिमुकल्यांना किरकोळ समस्या हाेत्या. उपचारानंतर या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे.

पालकांनी एकदम घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र कोरोना होऊन गेल्यावर मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनातून बरे झालेल्या मुलांना अंगावर चट्टे, पुरळ, डोळे लाल होणे यासारख्या समस्या उद्भवल्यास तत्काळ बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.

- डॉ. विनीत वरठे, विभाग प्रमुख, बालरोग विभाग, जीएमसी, अकाेला

पोस्ट कोविडच्या सुमारे ६० बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५ बालकांना सिग्निफिकंट हार्ट डिसिज असल्याचे समाेर आले. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुलं कोरोनातून बरे झाल्यानंतरही पालकांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

- डॉ. विशाल काळे, बालरोग तज्ज्ञ,

Web Title: Significant heart disease in 15 children of Post Kovid in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.