अकोल्यात रंगले मूर्ख संमेलन
By admin | Published: March 15, 2017 02:37 AM2017-03-15T02:37:40+5:302017-03-15T02:37:40+5:30
मूर्ख संमेलन महानगराची मनोरंजनाची परंपरा -जिल्हाधिकारी.
अकोला, दि. १४- अकोल्यातील गत ४५ वर्षांपासून सुरु असलेली मूर्ख संमेलनाची परंपरा गौरवशाली असून, आपण कधी-कधी सगळेच मूर्ख असतो, याची प्रचिती होण्यासाठी होळी पर्वावर आयोजित असे संमेलन आनंद व मनोरंजनाची पर्वणी असल्याचे उद्गार जिल्हाधिकारी जी .श्रीकांत यांनी काढले.
स्थानीय डॉ .आंबेडकर खुले नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी झालेल्या ४६व्या मूर्ख संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.मूर्खाधिराज विकास शर्मा यांच्या अध्यक्षतेत व संयोजक रामकिशोर श्रीवास यांच्या हस्ते या संमेलनात जी श्रीकांत यांना प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले .
माजी मंत्री सुधाकर गणगणे, नगरसेवक हरीश अलिमचंदानी, श्रीमती उषा विरक , अजय शर्मा, ज्येष्ठ पत्रकार मीरसाहेब ,हाजी आनिक आदींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा प्रारंभ डब्बू शर्मा, शिवहरी माळी , महादेवराव हुरपुडे, रवी मिश्रा, विनायक पांडे यांच्या गदर्भ वंदनेने करण्यात आला. प्रास्ताविक मूर्खाधिराज विकास शर्मा यांनी करून महानगरातील या परंपरेची माहिती दिली .
हजारो महिला -पुरुष रसिकांच्या उपस्थितीत या रंगारंग कार्यक्रमात रमेश थोरात यांचा मी मॅजिस्ट्रेट नं १, भक्ती साळोखे या चिमुरडीचा डान्स, पातूर येथील गजानन पोकळकर यांचा शेतकरी, महादेवराव भुईभार यांचे आम्ही गोंधळी , प्रसाद दामले,अरुण गावंडे यांचे हास्य कथा, शिवहरी माळी यांची छक्के पे चक्क कविता, विनायक पांडे यांचा अच्छे दिन, साई दीपक पातालबंशी यांचा सदाचार , विशाल राखोंडे यांचा शौचालय, रघुनाथ राहुडकर व अलोक अग्रवाल यांचा शेतकरी राजा, अंध विद्यालयातील मुलांची ढोलकीच्या तालावर कला, मुकेश साबळे, संजय जगताप यांची कला ,जादूगार एस. पी. सदांशीव यांचे जादूचे प्रयोग, कन्हैया पंजवाणी समूहाचे फिल्मी नृत्य , भारत वरठे यांची झकास लावणी , शिवलाल माझोडकर व त्यांच्या पत्नीचे हेमबाडी निवडणूक लढविते, ज्योती पारवाणी यांचे मदहोश करणारे नृत्य, आदीच्या कलांना रसिकांनी शिट्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शाहीर वसंतदादा मानवटकर व त्यांच्या संगीतमय चमूने कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दिलखुलास कार्यक्रम सादर करून इनाम मिळविलेत. यावर्षी त्यांनी मूर्खांची नायकीण या नुकत्याच झालेल्या मनपा निवडणूक व इव्हीएमच्या तथाकथित घोळावर आपला हास्य व्यंगाचा संगीतमय कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांना हसायला लावले. दरम्यान, सायंकाळी स्थानीय कोतवाली परिसरातून मूर्खाधिराज यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. टिळक मार्ग, जुने कापड बाजार ,जैन मंदिर ,गांधी मार्गाने ही मिरवणूक खुले नाट्यगृहात येऊन या ठिकाणी संमेलनास प्रारंभ झाला. संचालन डॉ .रामप्रकाश वर्मा यांनी तर आभार महादेवराव हुरपुडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्वेश कटियार , राजेंद्र श्रीवास, योगेश इंगळे ,अनुराग मिश्रा ,समाधान खरात ,गणेश शर्मा , प्रशांत नागे, किशोर बुंदेले, देवेंद्र श्रीवास ,शशिकांत नेहरे समवेत समस्त समिती सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.