‘सिमी’च्या दहशतवाद्यास अकोला कारागृहात हलविणार!
By Admin | Published: January 8, 2017 02:40 AM2017-01-08T02:40:50+5:302017-01-08T02:40:50+5:30
एटीएसच्या विशेष न्यायालयाची मंजुरी, नागपुरातून आणणार अकोल्यात.
अकोला, दि. ७-यवतमाळ जिल्हय़ातील पुसद येथील पोलीस कर्मचार्यावर हल्ला प्रकरणातील आरोपी सिमी या दहशतवादी आणि प्रतिबंधित संघटनेचा सदस्य असलेल्या सलीम मलिक ऊर्फ हाफिज मुजीबुर्ररहेमान याला नागपूर कारागृहातून अकोला कारागृहात हस्तांतरित करण्याचा विनंती अर्ज एटीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने शनिवारी मंजूर केला.
सदर आरोपीसोबत असलेल्या अन्य दोन आरोपींच्या जामीन अर्जावर आणि नागपुरातून अकोला कारागृहात हस्तांतरण प्रक्रियेच्या अर्जावर २१ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
पुसद येथील पोलीस कर्मचार्यावर येथील रहिवासी तसेच सिमी संघटनेचा सदस्य अब्दुल मलिक अब्दुल रज्जाक, हाफिज मुजीबुर्ररहेमान खान आणि शोएब अहेमद खान या तिघांनी २५ सप्टेंबर २0१५ रोजी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी अकोला एटीएसने सदर तीनही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0७, ३३२, ३३३, १५३, १८६ आणि आर्म्स अँक्टच्या कलम ४, २५ आणि १३५ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अकोला येथे कार्यान्वित झालेल्या एटीएसच्या विशेष न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. एटीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मुजीबुर्ररहेमान खान याला नागपूर कारागृहातून अकोला कारागृहात हस्तांतरित करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली असून, त्यांच्या न्यायालयाने आरोपीच्या हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे, तर अन्य दोन आरोपींच्या अर्जावर २१ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.