सिंधी कॅम्पमधील अनधिकृत बांधकाम पाडले!
By admin | Published: February 8, 2016 02:35 AM2016-02-08T02:35:27+5:302016-02-08T02:35:27+5:30
अकोला महापालिकेची कारवाई.
अकोला: मंजूर नकाशापेक्षा दुप्पट बांधकाम करण्यात येत असलेल्या सिंधी कॅम्पमधील निर्माणाधीन इमारतीवर महापालिकेने रविवारी कारवाई केली. अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू असताना इमारत बांधकाम व्यावसायिकाने कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सिंधी कॅम्प परिसरात मनपाच्या हद्दीत असलेल्या शीट क्रमांक ५६, नझुल प्लॉट क्रमांक ४/१ या प्लॉटवर मुकेश आलिमचंदानी यांचे बांधकाम सुरू आहे. येथे १२0 चौरस मीटर जागेवर इमारत बांधकामासाठी नकाशा मंजूर करून घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र मंजूर नकाशापेक्षा ११८ चौरस मीटर अधिक म्हणजे दुप्पट बांधकाम केले जात असल्याचे आढळून आले. एकूण २३0 चौरस मीटर बांधकाम सुरू असल्याने रविवारी मनपाच्या नगर रचना विभागाने कारवाई करीत जेसीबीने इमारतीचा काही भाग पाडला. यावेळी काही काळासाठी तनावाची स्थिती निर्माण झाली होती. येथे बांधकाम करताना समास अंतरामधील पूर्व बाजू ४.५ मीटरऐवजी अवघी १ मीटर, उत्तर बाजू १.५ मीटरऐवजी 0.५0 मीटर, दक्षिण बाजू १.५0 ऐवजी काहीच सोडली नसल्याचे आढळून आली. पश्चिम बाजूला कॉमन वॉल बांधण्यात आली असल्याचे दिसून आले.