अकोल्याच्या सुफीयानच्या निर्णायक गोलमुळे सिंगापूरचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:58 PM2019-11-22T18:58:31+5:302019-11-22T18:59:05+5:30
या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण गोल सुफीयान याने करू न भारताला विजय मिळवून दिला.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या ४७ व्या शालेय आशियाई १८ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत अकोल्याचा सुफीयान शेख भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. सिंगापूरविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ४-१ गोलने विजय मिळविला. या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण गोल सुफीयान याने करू न भारताला विजय मिळवून दिला.
सुफीयान हा अकोल्यातील पहिला फुटबॉलपटू ठरला, ज्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन गोल करू न स्वर्णिम इतिहास रचला. सुफीयान लहानपणापासून लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे फुटबॉलचे धडे गिरवित होता. यानंतर क्रीडापीठ बालेवाडी पुणे येथे फुटबॉलचे धडे प्रशिक्षक धीरज मिश्रा यांच्याकडून प्राप्त केले. आज आशिया खंडात इंडोनेशिया येथे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. सुफीयानला फुटबॉलचा वारसा आपल्या घराण्यातूनच मिळाला आहे. सुफीयानचे आजोबा शेख चांद अकोल्यातील पहिले संतोष ट्रॉफी प्लेअर आहेत. वडील शेख फहिम हे पोलीस विभागाचे स्टार फुटबॉलपटू आहेत. सुफीयानला मातुल घराण्यातूनही खेळाचा वारसा मिळाला आहे. मामा शेख हसन शेख अब्दुला पहिलवान आहेत. आजोबा शेख अब्दुला आणि शेख नजीर पहिलवान हे दोघेही विदर्भ केसरी आहेत. शेख सर्फराज हेसुद्धा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहेत. सुफीयानच्या आंतरराष्ट्रीय खेळीमुळे अकोला फुटबॉलला गतवैभव प्राप्त होण्याची आशा फुटबॉलप्रेमींमध्ये पल्लवित झाली आहे.
१५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केल्या आहेत. भारतीय संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर सिहोर (मध्य प्रदेश) येथे झाले. शिबिरामध्ये देशभरातील ४० खेळाडू सहभागी झाले होते. यामधून २० खेळाडूंची निवड भारतीय संघात झाली. यामध्ये सुफीयान शेख हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे, हे येथे उल्लेखनीय.
भारताला मिळाला नव्या ऊर्जाचा खेळाडू
फुटबॉल १८ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंगापूर संघाला अकोल्याच्या सुफीयान शेखच्या दोन गोलमुळे पराभवाचे तोंड पाहावे लागले. ही भारतासाठी आनंदाची बाब आहे; मात्र आज फिफा २०२२ फुटबॉल वर्ल्ड कप क्वॉालिफाय सामन्यात भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघाला ओमान संघाने १-० ने हरविले. यामुळे भारतीय संघ फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ साठी पात्र होऊ शकला नाही; मात्र सुफीयानसारखे नव्या ऊर्जेचे फुटबॉलपटू भारतीय संघात गेल्यास भारतीय संघ निश्चितच वर्ल्ड कपकरिता पात्रता सिद्ध करेल, अशा प्रतिक्रिया फुटबॉलपटूंनी व्यक्त केल्या.