एकरी उत्पादन पोहोचले ८.४ क्विंटलवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:47 AM2017-11-23T02:47:05+5:302017-11-23T02:50:02+5:30
देशातील पहिल्या बीटी कापसाची वेचणी आता शेवटच्या टप्प्यात असून, आतापर्यंत एका एकरात आतापर्यंत ८.४ क्विंटल एवढा उतारा आला आहे. आणखी चार ते पाच क्विंटल कापूस अपेक्षित असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. बीटीचे हे देशी वाण विकसित केल्यानंतर प्रथमच यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचणी घेण्यात येत आहे.
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशातील पहिल्या बीटी कापसाची वेचणी आता शेवटच्या टप्प्यात असून, आतापर्यंत एका एकरात आतापर्यंत ८.४ क्विंटल एवढा उतारा आला आहे. आणखी चार ते पाच क्विंटल कापूस अपेक्षित असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. बीटीचे हे देशी वाण विकसित केल्यानंतर प्रथमच यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर चाचणी घेण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जीन्स टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत असलेल्या पश्चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर चाचणीसाठी या बियाण्याची जून महिन्यात पेरणी करण्यात आली होती.
कपाशीच्या या झाडांना भरघोस कापूस आला आहे; पण पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर्षी पाणीच उपलब्ध नसल्याने जेमतेम पाण्यावर ही चाचणी घेण्यात आली असून, आतापर्यंतच्या एका एकरात दोन वेचण्या पूर्ण झाल्या असून, ८.४ क्विंटल उत्पादन झाले आहे. आणखी चार ते पाच क्विंटल कापूस होणार असल्याचे कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नियमित वेचणीसह फरदडचा कापूसही निघण्याची शक्यता आहे.
एक एकर क्षेत्रावर बीटी कापसाची चाचणी!
मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या पश्चिम विभागाच्या क्षेत्रावर एक एकर क्षेत्रावर बीटी कपाशीची चाचणी घेतली जात आहे. यामध्ये कोरडवाहू आणि ओलीत अशा दोन प्रकारच्या बीटी कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. एकरी १२ क्विंटल उत्पादन म्हटले, तरी हे चांगले उत्पादन मानले जात आहे. वेळेवर पाऊस आला असता, तर हे उत्पादन अधिक झाले असते, असा दावाही कृषी शास्त्रज्ञांनी केला.
आतापर्यंत जिराईत व ओलिताच्या एका एकर क्षेत्रात ८.४ क्विंटल देशी बीटी कापसाचे उत्पादन झाले आहे. आणखी चार ते पाच क्विंटल उत्पादन होईल. पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम झाला आहे, अन्यथा १५ क्विंटलच्यावर उत्पादनाची शक्यता होती.
- शंकरराव देशमुख,
विभाग प्रमुख, पश्चिम संशोधन प्रक्षेत्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
--