साहेब, पिकांचे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदतीचा आधार द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 10:56 AM2021-07-26T10:56:35+5:302021-07-26T10:56:43+5:30
Agriculture Minister Dadaji Bhuse : रामगाव येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना रविवारी साकडे घातले.
अकोला : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे साहेब, पिकांचे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाइच्या मदतीचा आधार द्या, अशा शब्दात रामगाव येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना रविवारी साकडे घातले.
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्हा दौऱ्यात विविध गावांना भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. त्यामध्ये रामगाव येथील पीक नुकसानाची पाहणी करीत, शेतकऱ्यांशी चर्चा करून व्यथा जाणून घेतली. अतिवृष्टी व पुरामुळे गावातील सर्वच शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पीक नुकसान भरपाइची मदत देताना केवळ नदी व नाल्याकाठच्या पीक नुकसानाचा विचार न करता, पिकांचे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना मदतीचा आधार देण्याची मागणी शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांकडे केली. यावेळी रामगावच्या सरपंच तायडे, शेतकरी शिवाजीराव भरणे, अरुण लोडम, सुभाष भोगे, मुकिंदा गावंडे आदी शेतकऱ्यांसह तलाठी, कृषी सहायक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.