रक्तटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी बहीण-भाऊ निघाले दौऱ्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:45 PM2019-05-12T13:45:56+5:302019-05-12T13:46:37+5:30
रक्तदानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. या उदात्त हेतूने पुण्यातील बहीण-भाऊ राज्याच्या दौºयावर निघाले आणि प्रत्येक जिल्ह्यात रक्तमित्र, रक्तपेढ्यांच्या मदतीने त्यांनी जनजागृती मेळावे घेतले.
अकोला: रक्तदान हे जीवनदान आहे; परंतु अद्यापही समाजामध्ये रक्तदान करण्याविषयी अनास्था आहे. आपल्या रक्तदानाने एखाद्याचे प्राण वाचू शकतात, ही भावनाच जनमानसात रुजली नाही. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्ताची मोठी कमतरता जाणवते. उन्हाळ्यामध्येसुद्धा रक्तदानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. या उदात्त हेतूने पुण्यातील बहीण-भाऊ राज्याच्या दौºयावर निघाले आणि प्रत्येक जिल्ह्यात रक्तमित्र, रक्तपेढ्यांच्या मदतीने त्यांनी जनजागृती मेळावे घेतले.
पुण्यातील महेश बांगड व स्नेहल बांगड ही भावंडे शनिवारी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून अकोल्यात आले होते. अकोला ब्लड बँक व रक्तदात्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रुग्णांना रक्ताची गरज असते; परंतु उन्हाळ्यामध्ये रक्तदानाचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात रक्तदान केल्यामुळे कोणताही त्रास होत नाही. नागरिकांनी त्याबाबतचे गैरसमज दूर सारले पाहिजे, असे आवाहनही बांगड भावंडांनी केले.
पुणे येथील महेश बांगड व स्नेहल बांगड हे भावंड रक्ताचे नाते ट्रस्ट (पुणे) या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उन्हाळ्यात रक्तदान चळवळीला गती देण्यासाठी रक्ताच्या टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृती दौरा करीत आहेत. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड गत २५ वर्षांपासून रक्तदान जनजागृतीचे काम करीत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, महेश व स्नेहल रक्तदानाची चळवळ गतिमान करण्यासाठी योगदान देत आहेत. अकोला ब्लड बँकेत झालेल्या कार्यक्रमात डॉ. के. के. अग्रवाल यांनी बांगड भावंडांचे स्वागत केले. यावेळी बांगड भावंडांनी रक्तमित्रांसोबत संवाद साधला आणि रक्तदान चळवळीविषयी चर्चा केली. यावेळी कार्यक्रमाला रक्तमित्र व स्वयंसेवक निशीकांत बडगे, विपुल माने, मोहन लुले, निखिल पाटील, गोपाळ सुलताने, दर्पण कणकरिया, निखिल खानझोडे, आशिष सावळे, आशिष कसले, प्रणव जोशी, पवन डंबलकर, अंकित तायडे, दिलीप गावंडे, डॉ. रेखा अग्रवाल, वैभव वायचाळ, संतोष सांगेवर, सिद्धिविनायक स्वामी, लक्ष्मण चोरे, सुरेंद्र रोहणकार व ब्रम्हा वारोठे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बांगड भावंडे चालवितात, ब्लडलाइन महाराष्ट्र मोहीम
रक्ताचे नाते ट्रस्टमार्फत रक्तदाते, रक्तमित्र, स्वयंसेवकांना ब्लडलाइन महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे जोडण्याचे काम बांगड भावंडे करीत आहेत. त्यासाठीच त्यांनी दौरा सुरू केला असून, ठिकठिकाणच्या खासगी, शासकीय रक्तपेढ्यांसोबत रक्तदाते, रक्तमित्र व स्वयंसेवकांच्या भेटी घेत आहेत.