तळीरामांना आता देशी दारू दुकानात बसून पिण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:33 PM2018-04-23T15:33:13+5:302018-04-23T15:35:29+5:30
अकोला : तळीरामांना आता देशी दारू दुकानात पिण्यास बंदी घातली जाणार आहे. तसे विधेयक येत असून, उत्पादन शुल्क विभागाने आता मद्यपी आणि विक्रेत्यांकडून या संदर्भात सूचना मागितल्या आहेत.
अकोला : तळीरामांना आता देशी दारू दुकानात पिण्यास बंदी घातली जाणार आहे. तसे विधेयक येत असून, उत्पादन शुल्क विभागाने आता मद्यपी आणि विक्रेत्यांकडून या संदर्भात सूचना मागितल्या आहेत. दुकानातून दारू नेल्यास सामाजिक तंटे आणि वाद कमी होतील, असा जावई शोध काढला गेला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
देशी दारू दुकानात आता ९० मिलीलीटरची बाटली आता बंद होणार आहे. त्याठिकाणी ३० आणि ६० मिलीलीटरची दारू पाऊच पार्सल स्वरूपात येणार आहे, असे आदेश उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाले आहेत. देशी दारू दुकानात मद्य पिण्यास बंदी घातल्यास तळीराम थेट घरी जातील आणि पाऊचमुळे प्रदूषण कमी होईल. पोलिसांचा ताणही कमी होईल, असा जावई शोध लावून ही नियमावली येत आहे. मद्य पार्सल नेण्यासाठी अधिकृतपणे परवाना दिला जाणार आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाने मागविलेल्या अभिप्रायात अधिकाऱ्यांनी आणि मद्यविक्रेत्यांनी या नवीन नियमावलीस विरोध दर्शविला आहे. मात्र, शासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे बोलले जात आहे.
देशी दारू दुकानात आजघडीला चकना आदी सेवा अत्यल्प दरात मिळते. मात्र, भविष्यात ही नियमावली आल्यास चकना विकणे दारू दुकानात बंद होईल. त्यानंतर पार्सल घेतल्यानंतर तळीराम कोठे बसतील याचा नेम नाही. चकना मिळविण्यासाठी कुठे जातील, हे सांगता येत नाही. देशी पार्सलची विक्री सुरू झाल्यास तळीराम भररस्त्यावर, मैदानात आणि सार्वजनिक ठिकाणी बसणार नाही, हे कशावरून, असा प्रश्नही आता मद्यविक्री करणाºया दुकानदारांकडून उपस्थित होत आहे. उलटपक्षी त्यांचे अधिकृत ठिकाण हिरावल्या जाऊन ते भररस्त्यावर येतील, अशी शक्यता आहे. या नियमावली संदर्भात शासनाने फेरविचार करावा, अशी मागणीही आता समोर येत आहे. मात्र, शासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.