मनपाने बांधले ओटे; जठारपेठ चौकातील भाजी विक्रेत्यांचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:17 PM2020-02-18T14:17:01+5:302020-02-18T14:17:14+5:30
चौकात अतिक्रमण थाटणाºया भाजी विक्रेत्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून मनपा शाळा क्रमांक ५ च्या आवारात मनपा प्रशासनाने ओटे बांधून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मनपा प्रशासनाचा उदासीन कारभार आणि सत्तापक्षाकडून होणाऱ्या मतांच्या राजकारणात जठारपेठ चौकातील रहिवासी मागील अनेक वर्षांपासून भरडल्या जात आहेत. या चौकात अतिक्रमण थाटणाºया भाजी विक्रेत्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून मनपा शाळा क्रमांक ५ च्या आवारात मनपा प्रशासनाने ओटे बांधून दिले. ओट्यांचे वितरण केल्यावरही भाजी विके्रत्यांनी महापालिकेला ठेंगा दाखवत जठारपेठ चौकातच दुकाने थाटल्याची परिस्थिती आहे. परिणामी अतिक्रमणाच्या समस्येमुळे वाहतुकीची कोंडी कायम असून, या मुद्यावर प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने सोयीस्कर चुप्पी साधल्याचे दिसत आहे.
जठारपेठ चौकातील अतिक्रमित भाजी विके्रत्यांचा हेकेखोरपणा मागील अनेक वर्षांपासून कायम असल्याचे दिसून येते. मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे, डॉ. विपीन कुमार शर्मा, डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच अजय लहाने यांसारख्या खमक्या अधिकाऱ्यांनी जठारपेठ चौकातील अतिक्रमकांना हुसकावण्याची ठोस कारवाई केली होती. अशावेळी मनपाचे वरिष्ठ अधिकारी ‘मॅनेज’होत नसल्याचे दिसताच अतिक्रमित भाजी विके्रता, फळ विके्रत्यांकडून हातपाय जोडून विनवण्या केल्या जात असल्याचा पूर्वानुभव आहे. खमक्या अधिकाºयांच्या बदल्या होताच अतिक्रमकांकडून जठारपेठ चौकात चक्क रस्त्यावर दुकाने थाटली जातात. टॉवर ते जठारपेठ चौक ते उमरी परिसर अत्यंत गजबजलेला आणि सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग आहे. भाजी विके्र्रता, फळ विके्रत्यांच्या अतिक्रमणामुळे या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते.
यावर तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी आ. रणधीर सावरकर यांच्या निधीतून मनपा प्रशासनाने मनपा शाळा क्रमांक ५ मध्ये भाजी विके्रत्यांना ओटे बांधून देण्यात आले. लकी ड्रॉ पद्धतीने मनपाच्या मुख्य सभागृहात ओट्यांचे वितरण केले. दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही भाजी विके्रत्यांनी त्यांचे बस्तान हलविले नसल्याचे चित्र समोर आले आहे. मतांच्या राजकारणापायी सत्ताधारी भाजपकडून संबंधित अतिक्रमकांचे लाड पुरविल्या जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अतिक्रमणामुळे वाद, हाणामाºया
जठारपेठ चौकातील अतिक्रमणाच्या समस्येमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे. वाहनांचा धक्का लागल्याच्या कारणावरून या ठिकाणी अनेकदा वाहनधारकांमध्ये वाद व हाणामाºयादेखील होतात. १५ फेब्रुवारी रोजी रात्री जठारपेठ चौकात राडा होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीला अतिक्रमणाची समस्या कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
जठारपेठ चौक परिसरात अनेक शाळा आहेत. शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांची सकाळी ७ वाजतापासूनच वर्दळ सुरू होते. नेमक्या यावेळी भाजी विके्रता, फळ विके्रता रस्त्यावर बाजार मांडतात. वाहतुकीच्या कोंडीमुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असून, मनपाने ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.