अकोल्यात शुकशुकाट, परिस्थिती नियंत्रणात; संचारबंदीमुळे बाजारपेठेसह दुकाने, पेट्रोल पंप बंद
By नितिन गव्हाळे | Published: May 14, 2023 02:00 PM2023-05-14T14:00:30+5:302023-05-14T14:01:08+5:30
जुने शहरातील जय हिंद चौक, हरिहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास दोन गटात दगडफेक व हाणामारीची घटना घडली.
अकोला: सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संवादामुळे उशिरा रात्री निर्माण झालेल्या तणावाच्या पृष्ठभूमिवर अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अकोला शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत असून, बाजारपेठेसह दुकाने, पेट्रोल पंप बंद आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे.
जुने शहरातील जय हिंद चौक, हरिहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास दोन गटात दगडफेक व हाणामारीची घटना घडली. दोन्ही बाजुकडील गट एकमेकांवर चालून गेल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड करून काही घरांना आग लावली. दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत अश्रृधुराच्या कांड्या व हवेत गोळीबार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा जिल्हाधिकारी नीमा अराेरा यांनी संचारबंदी लागू केल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.
जमावाने केलेल्या दगडफेक व तोडफोडीमध्ये एक व्यक्ती ठार झाला तर सहा जण जखमी झाले. यात एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. दरम्यान रविवारी आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्तचे कार्यक्रम, शोभायात्रा तसेच मोटिव्हेशनल स्पीकर सोनु शर्मा यांचा कार्यक्रम आदी रद्द करण्यात आले आहेत. रविवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेतील दुकाने व पेट्रोल पंप बंद असल्याने, तसेच रिक्षाही बंद असल्याने सामान्यांची अडचण झाली आहे.
जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, माजी महापौर विजय अग्रवाल आदींनी जुने शहरात फिरून परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.