सहा उमेदवार रिंगणाच्या बाहेर!

By admin | Published: February 5, 2017 02:47 AM2017-02-05T02:47:28+5:302017-02-05T02:47:28+5:30

अकोला महापालिका निवडणूक; सात उमेदवारी अर्ज ठरले बाद!

Six candidates out of the ring! | सहा उमेदवार रिंगणाच्या बाहेर!

सहा उमेदवार रिंगणाच्या बाहेर!

Next

अकोला, दि. ४- महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जातील त्रुटी इच्छुक उमेदवारांच्या अंगलट आल्या आहेत. प्राप्त अर्जांची शनिवारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी छाननी केली असता, १३ उमेदवारी अर्ज बाद ठरले. यामधील सहा उमेदवार निवडणूक रिंगणातून बाद झाल्याची माहिती मनपा निवडणुक कार्यालयाकडून देण्यात आली.
महापालिका निवडणुकीचा आखाडा गाजवण्यासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे निकष लक्षात घेता, यंदा उमेदवारी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना संबंधिताना चांगलाच घाम फुटल्याचे दिसून आले. उमेदवारांना ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावे लागले. अर्जाची प्रिंटआउट काढून त्याला आवश्यक सर्व कागदपत्रांच्या स्वाक्षांकित प्रती जोडून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आले. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिवशी महापालिकेकडे एकूण ८८२ अर्जांची नोंद घेण्यात आली. आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्जाचा नमुना तयार करण्यात आला होता. नमुन्यानुसार उमेदवारी अर्जातील कोणताही रकाना इच्छुक उमेदवारांना रिक्त ठेवता येणार नसल्याने माहिती निरंक असल्यास किंवा लागू नसल्यास तसे नमूद करावे लागले.
शपथपत्रातील कोणत्याही रकान्यामधील माहिती न भरल्यास किंवा रिक्त ठेवल्यास उमेदवारी अर्ज बाद होणे निश्‍चित होते. ज्या प्रभागातून तसेच आरक्षणातील प्रवर्गानुसार निवडणूक लढवायची आहे, त्या प्रभागाचा क्रमांक, आरक्षणाच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख करावा लागणार होता. उमेदवारी अर्ज भरताना जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबीचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा लागला. वैयक्तिक शौचालय असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागले. अशा विविध माहितीसह सादर करण्यात आलेल्या ८८२ उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शनिवारी (४ फेब्रुवारी) पार पडली. यावेळी १३ उमेदवारी अर्ज बाद ठरले असून, यापैकी ६ उमेदवार अपात्र ठरले.

Web Title: Six candidates out of the ring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.