महिनाभरात डेंग्यूचे सहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 02:04 PM2019-11-12T14:04:32+5:302019-11-12T14:04:38+5:30
अकोला जिल्ह्यातही डेंग्यू, चिकुनगुनियासदृश तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मध्यंतरी झालेल्या परतीच्या पावसानंतर वातावरणातील बदलाचा फटका अकोलेकरांना बसत आहे. अकोला शहरासह ग्रामीण भागातही व्हायरल फिव्हरने डोकेदुखी वाढविली असून, जिल्ह्यात गत महिनाभरात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आले. त्यामुळे डेंग्यूपासून सावध राहा, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे अकोलेकरांना देण्यात आला आहे.
सध्या राज्यभरात डेंग्यू, चिकुनगुनियाने थैमान घातले आहे. अकोला जिल्ह्यातही डेंग्यू, चिकुनगुनियासदृश तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिवाय, वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्यासह तापाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसोबतच खासगी दवाखाने हाउसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषत: डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत डेंग्यूच्या प्रसाराचा धोका संभवत असल्याने जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे १५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत कंटेनर सर्व्हेची विशेष मोहीम राबविण्यात आली. परतीचा पाऊस लांबल्याने मोहिमेचा कालावधी दोन आठवडे वाढविण्यात आला आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाचा कंटेनर सर्व्हे
दिवस परतीचा पाऊस लांबल्याने जिल्हा हिवताप विभागातर्फे कंटेनर सर्व्हेचा कालावधी आणखी १५ दिवस वाढविण्यात आला आहे. हा सर्व्हे १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, यांतर्गत जिल्ह्यात यापूर्वी ज्या ज्या भागात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले, अशा ठिकाणी घरोघरी जाऊन पाणी साठविण्याच्या भांड्यांची पाहणी केली जाणार आहे तसेच परिसरातील स्वच्छतेचीही पाहणी केली जाईल.
चिकुनगुनियाचाही धोका
व्हायरल फिव्हरमुळे नागरिक सर्दी, खोकला तापीने त्रस्त आहेत. अशातच डेंग्यूचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूसह चिकुनगुनियाचाही धोका असल्याने नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
जिल्ह्यात कंटेनर सर्व्हेच्या मोहिमेचा कालावधीही वाढविला आहे. यांतर्गत जिल्ह्यातील डेंग्यूसदृश भागात सर्व्हे करण्यात येणार आहे; मात्र नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या.
- डॉ. विवेक पेंढारकर, जिल्हा हिवताप अधिकारी.