मनपा कर विभागातील सहा कर्मचारी निलंबित; कामचुकारपणा भोवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:26 PM2018-09-07T13:26:56+5:302018-09-07T13:28:27+5:30
अकोला : शहरातील मालमत्ताधारकांजवळून थकीत मालमत्ता कर वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर विभागातील सहा कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले.
अकोला : शहरातील मालमत्ताधारकांजवळून थकीत मालमत्ता कर वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर विभागातील सहा कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. मनपाच्या मुख्य सभागृहात कर वसुलीचा आढावा घेत असताना या विभागातील काही कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे आयुक्त वाघ यांच्या निदर्शनास आले.
महापालिका प्रशासनाने मालमत्तांचे पुनमूर्ल्यांकन केल्यानंतरही अपेक्षित वसुली होत नसल्याचे चित्र आहे. शहरातील मालमत्ताधारकांकडे आजरोजी तब्बल ४१ कोटींचा कर थकीत आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मनपाच्या कर विभागाकडे ३५ वसुली लिपिक कार्यरत आहेत. वसुली लिपिकांच्या कामकाजाचा महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी आढावा घेतला असता अत्यल्प वसुली केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात जाब विचारला असता वसुली लिपिक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. ही बाब पाहता आयुक्त वाघ यांनी सहायक अधीक्षक राजेंद्र गाडगे, वसुली लिपिक किरण शिरसाट, ईश्वर नरडे, संतोष साबळे, राहुल देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला. मनपा आयुक्तांच्या निर्णयामुळे कामचुकार कर्मचाºयांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.