राज्यातील सहा कारागृह लॉकडाउन - गृहमंत्री देशमुख यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 05:52 PM2020-04-20T17:52:09+5:302020-04-20T17:52:40+5:30
पोलीस चौकशीदरम्यान सुमारे १०० जणांना अटकही करण्यात आली असल्याची माहितीही ना. देशमुख यांनी येथे दिली.
अकोला : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यातील सहा कारागृह खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी सोमवारी अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पालघर येथे घडलेली घटना दुर्दैवी असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी शासनाने सुरू केली आहे. शिवाय पोलीस चौकशीदरम्यान सुमारे १०० जणांना अटकही करण्यात आली असल्याची माहितीही ना. देशमुख यांनी येथे दिली.
यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर उपस्थित होते. ना. देशमुख यांनी माहिती दिली की, राज्यात सहा ठिकाणच्या तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने हे तुरुंग लॉकडाउन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या तुरुंगात बाहेरची कोणीही व्यक्ती आत जाणार नाही व आतली व्यक्ती बाहेर जाणार नाही, असे ना. देशमुख यांनी स्पष्ट केले. संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून ५७ हजार ५१७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, क्वारंटीन केले असतानाही बाहेर फिरताना आढळले म्हणून ५७२ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर लक्ष
सोशल मीडियातून प्रसारित संदेशाद्वारे सामाजिक वातावरण खराब केल्याप्रकरणी २४२ गुन्हे दाखल झाले आहेत. फेक न्यूजबद्दल राज्य शासनाने कडक धोरण अवलंबिले असल्याचे सांगून सोशल मीडियावर लक्ष असल्याची माहिती ना. देशमुख यांनी दिली.
वृत्तपत्र वितरणाबाबत समीक्षेनंतर निर्णय
वृत्तपत्र वितरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ घरोघर वाटप करण्यावर बंदी आहे. तथापि, स्टॉल्सवर विक्री करण्यास बंदी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत लवकरच या मार्गदर्शक सूचनेची वरिष्ठ पातळीवर समीक्षा करून निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.